टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर फलंदाज म्हणून आश्चर्यकारक कामगिरी केली. अश्विननं घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक झळकावलं. यासह त्यानं अनेक विक्रम रचले.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यानं कठीण परिस्थितीत फलंदाजी करत दमदार शतक झळकावलं. आर अश्विन हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेतले आणि 6 शतकं झळकावली. यासह त्यानं रवींद्र जडेजासोबत बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतासाठी सर्वात मोठी भागीदारीही केली.
अश्विनने 108 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपले शतक पूर्ण केलं, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक आहे. एकवेळ भारताच्या 144 धावांवर 6 विकेट पडल्या होत्या. परंतु अश्विननं जडेजाच्या साथीनं डाव सांभाळत संघाला 330 च्या पुढे नेलं. या दोन फलंदाजांमध्ये सातव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. चेन्नईतील घरच्या मैदानावर आर अश्विनचं हे दुसरं कसोटी शतक आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलं होतं.
आर अश्विनचं यापूर्वीचं सर्वात वेगवान कसोटी शतक 117 चेंडूत आलं होतं, जे त्यानं 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं होते. 2021 मध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध 124 चेंडूत शतक झळकावलं होतं. आता त्यानं बांगलादेशविरुद्ध 108 चेंडूत कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक झळकावलं. अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये 3400 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. तो सध्या कसोटीत जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू आहे.
हेही वाचा –
अश्विनची शतकी खेळी, जडेजासोबत भागीदारी करत रचला इतिहास; बांगलादेश पहिल्याच दिवशी बॅकफूटवर!
श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी सुरूच, पुन्हा एकदा शून्यावर बाद
शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलच्या नावे नकोसा रेकॉर्ड, विराट कोहलीचाही लिस्टमध्ये समावेश