भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आर अश्विन (R Ashwin) याला जगातील मातब्बर कसोटीपटूंमध्ये गणले जाते. गोलंदाजी याबरोबरच वेळप्रसंगी फलंदाजीतही आपली प्रतिभा दाखवत त्याने बऱ्याचदा सामन्यातील अथवा मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्याचा मान पटकावला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतही तो मालिकावीर (Man Of The Series) ठरला आहे. यानंतर त्याने आपल्या या यशावर लक्षवेधी अशी प्रतिक्रिया दिली आहे. (R Ashwin On Man Of The Series Award)
२ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी करताना एकूण ८ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ८ षटके गोलंदाजी करताना फक्त ८ धावांवर त्याने न्यूझीलंडच्या ४ फलंदाजांना बाद केले. यादरम्यान त्याने २ षटके निर्धावही टाकली. हीच गोलंदाजी कायम ठेवत पुढील डावात २२.३ षटकांच्या स्पेलमध्ये ९ निर्धाव षटके टाकत ३४ धावांवर त्याने पुन्हा ४ विकेट्स पटकावल्या.
तत्पूर्वी कानपूर येथील पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने प्रत्येकी डावात ३-३ अशा एकूण ६ विकेट्स काढल्या होत्या. पहिल्या डावात ४२.३ षटकांमध्ये ३ फलंदाजांना बाद केले होते. यादरम्यान त्याने ८२ धावा खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ३० षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत पुन्हा ३ फलंदाजांना तंबूत धाडले होते. अशाप्रकारे संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करत १४ विकेट्स घेतल्याने अश्विनला या कसोटी मालिकेचा मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
यासह तो भारताकडून कसोटी क्रिकेटध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर बनणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत ८१ कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये ९ वेळा तो मालिकावीर राहिला आहे.
आपल्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला की, “माझ्या हिशोबाने मला आतापर्यंत १० मालिकावीर पुरस्कार मिळाले आहेत. मला वानखेडेच्या मैदानावर गोलंदाजी करायला आवडते. त्यातही यावेळी मुंबई कसोटीच्या प्रत्येक दिवशी काही-ना-काही वेगळे घडत होते. मी येथे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. आता मी दक्षिण आफ्रिकेत जाऊन मालिका जिंकू इच्छित आहे. कारण तिथे आतापर्यंत भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकलेली नाही. परंतु यावेळी आम्ही नक्कीच विजय मिळवूनच परत येऊ.”
महत्त्वाच्या बातम्या-
फिफ्टी..फिफ्टी..फिफ्टी.. ‘या’ विक्रमात धोनीही नाही पकडू शकणार कोहलीचा हात, ठरलाय पहिला अन् एकमेव
ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विजयाने शेवट, त्यानंतर टीम इंडिया केव्हा खेळणार पुढील सामना? घ्या जाणून