फिरकीचा जादूगार रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान त्यानं अचानक निवृत्तीची घोषणा केली. अश्विन दीर्घकाळ कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू होता. मुळात फिरकीपटू असलेल्या अश्विननं अनेक प्रसंगी विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये बॅटनं आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
सोशल मीडियावर चाहते अनेक वेळा अश्विन आणि महेंद्रसिंह धोनीची तुलना करतात. अश्विननं कसोटीत धोनीपेक्षा जास्त शतकं ठोकली असल्याचा दावा अनेक जणांद्वारे केला जातो. मात्र या दाव्यांत किती तथ्य आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आम्ही तुम्हाला हे या बातमीद्वारे सांगतो.
अश्विन आणि धोनी या दोघांनीही आपल्या कसोटी कारकिर्दीत 6-6 शतकं झळकावली आहेत. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, धोनी हा यष्टिरक्षक फलंदाज होता, तर अश्विन फिरकी गोलंदाज किंवा फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळला. असं असताना देखील कसोटी क्रिकेटमध्ये या दोघांची शतकं समान आहेत.
अश्विन आणि धोनीची कसोटी शतकं समान असली, तरी अश्विननं विदेशी भूमीवर धोनीपेक्षा जास्त शतकं झळकावली आहेत. धोनीनं त्याच्या 6 पैकी 5 कसोटी शतकं भारतात आणि 1 पाकिस्तानात झळकावलं. तर अश्विननं 6 पैकी 4 कसोटी शतकं भारतात आणि उर्वरित 2 कसोटी शतकं वेस्ट इंडिजमध्ये ठोकली. अशा प्रकारे विदेशी भूमीवर कसोटी शतक झळकावण्याच्या बाबतीत अश्विन एमएस धोनीच्या पुढे आहे.
धोनी आणि अश्विनची कसोटी कारकीर्द
महेंद्रसिंह धोनी – माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीनं आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या सामन्याच्या 144 डावांत फलंदाजी करताना त्यानं 38.09 च्या सरासरीनं 4876 धावा केल्या. या कालावधीत त्यानं 6 शतकं आणि 33 अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 224 धावा होती.
रविचंद्रन अश्विन – रविचंद्रन अश्विननं आपल्या करिअरमध्ये 106 कसोटी सामने खेळले. याच्या 151 डावांमध्ये फलंदाजी करताना त्यानं 25.75 च्या सरासरीनं 3503 धावा केल्या. यामध्ये त्यानं 6 शतकं आणि 14 अर्धशतकं झळकावली. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 124 धावा होती.
हेही वाचा –
आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस
रहाणे-पुजाराच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला…
3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात