आयपीएलच्या या हंगामातील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बेंगलोर संघ केवळ 137 धावाच करू शकला आणि दिल्लीने सामना 59 धावांनी जिंकला.
दिल्लीच्या या विजयात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे मोठे योगदान राहिले. त्याने या सामन्यात 4 षटकांत 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. त्याने विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि इसरु उडानाला बाद केले. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने आयपीएलमध्ये सलग 19व्या डावात किमान एकतरी विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग डावात किमान एकतरी विकेट घेण्याच्या विनय कुमारच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विनय कुमारनेही सलग 19 आयपीएल डावात किमान एकतरी विकेट घेतल्या आहेत.
रबाडाने मागील 19 आयपीएल डावात 2/28, 1/33, 2/23, 1/26, 1/41, 2/32, 1/32, 4/21, 2/42, 4/22, 2/38, 2/23, 2/37, 2/31, 2/28, 3/26, 2/21, 1/51, 4/24 असे गोलंदाजी प्रदर्शन केले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग डावात किमान एकतरी विकेट घेण्याच्या यादीत विनय आणि रबाडा पाठोपाठ लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने सलग 17 आयपीएल डावात किमान एकतरी विकेट घेतली आहे. तर युजवेंद्र चहल तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने सलग 15 डावात किमान एकतरी विकेट घेतली आहे.