भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेट समाविष्ट करण्यात आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. दुसरीकडे भारतीय महिला संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या अंतिम सामन्यात भारताची फिरकीपटू राधा यादवने केलेल्या धावबादचा व्हिडिओ स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील अकराव्या षटकातील पहिला चेंडू भारतीय फिरकीपटू राधा यादव टाकत होती. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी बेथ मुनी स्ट्राइकवर होती. हा चेंडू मुनीने स्ट्रेट ड्राइव्ह मारला. जो थेट राधा यादवच्या दिशेने गेला. दुसरीकडे, नॉन स्ट्राईकला असलेली मेग लेनिंग क्रीजमधून बाहेर आली होती. राधाने हुशारीने चेंडू स्टम्पवर फेकला. ज्यामुळे लेनिंगची खेळी संपुष्टात आली. तीला बाद करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
Describe Radha Yadav's fielding in one word? 💡 pic.twitter.com/uSqUttJKCF
— ICC (@ICC) August 8, 2022
हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने लिहिले की राधाच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नांचे एका शब्दात वर्णन करा.
लोकांनी यावर भरभरून कमेंटही केल्या आहेत.
सुवर्णपदकासाठी झालेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना १६१ धावा रचल्या. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाज बेथ मूनीने संघासाठी सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर दुसरीकडे १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक ६५ धावा केल्या. मात्र, शेवटी भारतीय संघाला या सामन्यात केवळ १५२ धावा करता आल्या. परिणामी सामन्यात भारताला ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला. २०१७ वनडे विश्वचषकाच्या तसेच २०२० टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारतीय संघाला अशाच पद्धतीने पराभव पत्करावा लागला होता.