काल झालेल्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रियाचा तरूण टेनिसपटू डोमिनिक थीमचा ६-३, ६-४, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव करत राफेल नदालने विक्रमी १०व्यांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्या सामन्यात अव्वल मानांकित अँडी मरेचा रोमहर्षक सामन्यात ६-७, ६-३, ५-६, ७-६, ६-१ असा पराभव करत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाने अंतिम फेरीत प्रेवश केला. आता या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये रविवारी
२०१७ फ्रेंच ओपनच्या विजेतेपदासाठी लढत होईल.
९ वेळा फ्रेंच ओपनचा विजेता असणाऱ्या नदालने विक्रमी १०व्यांदा ह्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे नदाल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यापूर्वी कधीही हरलेला नाही. ९ पैकी ९ अंतिम फेरीत त्याने विजय मिळविला आहे. २००९, २०१५ आणि २०१६ वर्ष वगळता नदाल या स्पर्धेचा २००५ सालापासून अंतिम फेरीचा सामना खेळत आहे.
थीमला संपूर्ण सामन्यात नदालने कधी डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. थीमला फक्त २९ गेम्स नदाल विरुद्ध जिंकता आले. हा नदालने खेळलेल्या १३ फ्रेंच ओपन स्पर्धांमधील सर्वात मोठा विजय आहे. उपांत्य-पूर्व सामन्यात थीमने गतविजेत्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत उपांत्य सामन्यात धडक मारली होती.
दुसर्या उपांत्य सामन्यात गतवेळचा उपविजेता व क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या अँन्डी मरेचा तब्बल साडेचार तास चाललेल्या सामन्यात पाच सेटमधे ६-७, ६-३, ५-६, ७-६, ६-१ असा स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाने पराभव केला. हा विजय मिळवत तब्बल ३३ वर्षांनी अर्थात १९७३ नंतर अंतिम फेरी गाठणारा वावरिंका सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.
२०१५ चा फ्रेंच ओपन विजेता असणाऱ्या वावरिंकाने आपण क्ले कोर्टवर किती जबदस्त खेळ करू शकतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
जागतिक क्रमवारीत ३ऱ्या स्थानी असणाऱ्या स्टॅन वावरिंका आणि ४थ्या स्थानी असणाऱ्या राफेल नदालचा अंतिम फेरीचा सामना ११ जून रोजी फ्रेंच ओपनच्या सेन्टर कोर्टवर खेळवला जाईल. नदाल- वावरिंका आजपर्यंत १८ वेळा आमने-सामने आले असून त्यात नदालने १५वेळा तर वावरिंकाने ३ वेळा बाजी मारली आहे.२०१४ ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत नदालवर अंतिम फेरीत विजय मिळवून वावरिंकाने प्रथमच ग्रँडस्लॅम जिंकले होते. क्ले कोर्टवर आजपर्यंत या दोघांमधे ६ लढती झाल्या आहेत. त्यामध्ये नदाल ५-१ अशा फरकाने पुढे असला तरी स्टान वावरिंकाला कमी लेखून चालणार नाही. फ्रेंच ओपनचे विक्रमी दहावे विजेतेपद जिंकणे नदालसाठी तेवढे सोपे नक्कीच नाही.