चेन्नई । शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा बरोबर अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अजिंक्य रहाणेने यासाठी सराव देखील सुरुवात केला आहे.
sportstarlive.com वरील एका बातमीप्रमाणे आज जेव्हा भारतीय खेळाडू वॉर्म अप करत होते तेव्हा रहाणे फलंदाजीच्या सरावाला पोहचला देखील होता. प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या देखरेखीखाली हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर तो जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा सराव करत होता. जर सर्वकाही सुरळीत पार पडले तर या मुंबईकर खेळाडूला पहिल्या सामन्यात नक्की स्थान मिळेल.
भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा म्हणतो, ” अजिंक्यने सलामीवीर म्हणून विंडीजमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. तुमच्या संघात जर वैविध्य असेल तर कर्णधार आणि प्रशिक्षक यांना एकप्रकारे संघ निवडताना कोणतीही अडचण येत नाही. काही खेळाडू म्हणेल तेव्हा आणि म्हणेल त्या ठिकाणी फलंदाजी करतात. ”
रोहित पुढे म्हणतो, ” प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी संघाच्या जबाबदारीबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. श्रीलंका मालिकेपूर्वीच केएल राहुल ४थ्या क्रमांकावर खेळेल असे स्पष्ट झाले आहे. तुम्हाला संघाच्या गरजेप्रमाणे खेळावे लागते. ”
“भारताकडे अजिंक्य रहाणे सारखे खेळाडू आहे. त्याने विंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी करून मालिकावीर पुरस्कार मिळवला. आमच्याकडे राखीव खेळाडूंची फळी आहे. शिखरची कमी नक्की जाणवेल. परंतु आमच्याकडे त्याची जागा घेणारे खेळाडू आहेत. ” असे म्हणत रोहितने अजिंक्य रहाणेला संघात घेण्याचे संकेत दिले आहेत.