कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2023 मधील अठरावा सामना बार्बाडोस रॉयल्स विरुद्ध सेंट किट्स & नेविस पॅट्रिएट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात रॉयल्स संघाने तब्बल 221 धावांचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला. रॉयल्स संघाचा सलामीवीर रहकीम कॉर्नवॉल याने तुफानी शतक साजरे करत आपल्या संघाला विजयी रेषेपार नेले.
You make cricket beautiful, Rahkeem Cornwall. 💗pic.twitter.com/pM1poD8pxp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 4, 2023
मागील हंगामात अंतिम फेरी पर्यंतचा प्रवास केलेल्या रॉयल्स संघाला या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात पॅट्रिएट्स संघाने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली. त्यांची सलामी जोडी आंद्रे फ्लेचर व विल स्मिड यांनी आक्रमक फलंदाजी करताना केवळ 11.2 षटकांमध्ये 115 धावा फटकावल्या. फ्लेचर याने 37 चेंडूत 56 तर स्मिडने 36 चेंडूंवर 63 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर कर्णधार शेरफन रुदरफोर्ड याने अखेरपर्यंत नाबाद राहत 27 चेंडूत 65 धावांचा पाऊस पाडला. यांच्या योगदानामुळे पॅट्रिएट्स संघाने 4 बाद 220 अशी मोठी धावसंख्या उभारली.
या धावांचा पाठलाग करताना कायले मेयर्सने 5 चौकार मारत चांगली सुरुवात करून दिली. मात्र, तो फार काळ टिकू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावरील लोरी इवान्स याने 14 चेंडूत 24 धावा केल्या. त्यानंतर मात्र मैदानावर रहकीम कॉर्नवॉल याचे वादळ आले. त्याने विरोधी संघाच्या सर्वच गोलंदाजांचा अक्षरशा समाचार घेत षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू केली.
त्याने केवळ 45 चेंडूंमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिले सीपीएल शतक पूर्ण केले. रिटायर्ड हर्ट होत बाहेर जाण्यापूर्वी त्याने 49 चेंडूत 102 धावा कुटल्या. यामध्ये 4 चौकार आणि तब्बल 12 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल याने नाबाद 49 धावा करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कॉर्नवॉल याने आपले हे शतक आपल्या मुलाला अर्पण केले. त्याच्या मुलाचा वाढदिवस रविवारीच होता.
(Rahkeem Cornwall Hits Century In CPL Gift For His Son)
महत्वाच्या बातम्या-
‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या
कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध नेपाळ सामना?, जाणून घ्या लगेच