fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘या’ व्यक्तीने सचिन, गांगुलीला सांगितले होते; तुम्ही २००७ टी२० विश्वचषक खेळू नका

मुंबई । 2007 साली झालेल्या टी 20 विश्वचषकात तत्कालीन  निवड समितीचा अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी एमएस धोनीकडे नेतृत्वाची जबाबदारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 2007 च्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा भरणा होता. संघात वीरेंद्र सेहवाग देखील सामील होता ज्याने एका टी 20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व सेहवागकडे येईल असे अनेकांना वाटत होते. मात्र असे झाले नाही. भारतीय संघात युवराज सिंग देखील होता ज्याच्याकडे धोनीपेक्षा जास्त अनुभव होता. त्यावेळचे भारतीय संघाचे व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी दावा केला की, राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांना या टी 20 विश्वचषकात भाग न घेण्यास सांगितले होते.

2007 सालीच  वनडे विश्वचषक झाला होता. ज्यात राहुल द्रविडने संघाचे नेतृत्व केले होते. पण पहिल्याच फेरीत भारत स्पर्धेबाहेर पडला होता. सचिन राहुल आणि सौरव हे वनडे विश्वचषकामध्ये सहभागी झाले होते.

लालचंद राजपूत स्पोर्ट्सकीड़ाशी बोलताना म्हणाले की, “सचिन आणि सौरवला या विश्वचषकात खेळू नये असा सल्ला राहुलने जर दिला नसता तर ते दोघेही या विश्वचषकात खेळले असते. युवा क्रिकेटपटूंना या विश्वचषकात जास्त जास्त संधी मिळावी यासाठी त्यांनी सचिन आणि सौरवला न खेळण्यास सांगितले.”

सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत एकमेव टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे तर सौरव गांगुलीने एकही आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला नाही.

टी 20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये होता. काही खेळाडू थेट इंग्लंडहून जोहान्सबर्ग येथे पोहोचले होते. भारतीय संघाने या विश्वचषकात दमदार कामगिरी करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर एमएस धोनीला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले. अनिल कुंबळे यांच्या निवृत्तीनंतर तो कसोटी संघाचा देखील कर्णधार झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी 20 विश्वचषक,  त्यानंतर 2011 सालचा वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

You might also like