टी२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये २५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु होईल. ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जात आहे. अशात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध रणनीती आखली असावी. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने त्याच्या बॅटचे वजन कमी केले आहे. तर, दुसरीकडे भारताचे नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघातील खेळाडूंवर चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने या सामन्यात फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी त्याच्या बॅटचे वजन कमी करण्याची युक्ती वापरली आहे. त्याने बॅटच्या आकार बदलून घेतला आहे. त्याने बॅटला खालून सपाट करून घेतले आहे, ज्यामुळे तो सहजासहजी बॅकफूट पंच खेळू शकेल. विलियम्सन ऑफ साइडला बॅफफूट पंच आणि कवर शॉट उत्कृष्ट पद्धतीने खेळतो. तसेच त्याने या सामन्यासाठी त्याच्या बॅटचे वजन ५० ग्रॅमने कमी देखील केले आहे. सपाट बॉटम असल्यामुळे चेंडू कड लागून यष्टीरक्षकाकडे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. तसेच वजन कमी असल्यामुळे मोठा फटका मारताना जास्त ताकत लावता येऊ शकते.
ग्रीन पार्कमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांचा विचार केला तर, सामन्याचा निकाल लागण्यासाठी पाच दिवसांची वाट खूपच कमी वेळा पाहावी लागली आहे. फिरकी गोलंदाजांच्या वर्चस्वामुळे सामन्याचा निकाल तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूंसोबत चर्चा केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासोबत नेट्समध्ये जवळपास १५ मिनिट चर्चा केली आणि त्यांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचे मार्गदर्शन केले आहे
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ –
केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेरिल मिचेल, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, विल सोमरविले, टिम साउदी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅग्नर.