-शरद बोदगे
काल भारतीय संघाने चौथ्यांदा १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत भारताला एवढे यश आजपर्यंत कधीच मिळाले नाही. १२ स्पर्धांत ६ अंतिम फेरी त्यात ४ विजेतेपद तेही केवळ ३० वर्षांमध्ये, निश्चितच मोठी गोष्ट आहे.
विशेष म्हणजे टीम इंडिया यातील दोन वेळा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली अंतिम फेरीत गेली. त्यामुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव हा होणारच होता शिवाय त्याबद्दल आदरही नक्कीच वाढणारा आहे. राहुल द्रविड हा एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून जगात ओळखला जातो. अगदी त्याच्या ऐन उमेदीच्या काळातही त्याच्याकडे चुकीच्या वागण्यासाठी कुणाची बोट दाखवायची हिम्मत होत नव्हती.
जगातील एक संथ फलंदाजी करणारा खेळाडू असा शिक्का द्रविडवर कायमच असला तरी त्याने ३४४ वनडे सामने खेळले आहे हे त्याच्या अनेक चाहत्यांना माहीतही नसेल. ३०० पेक्षा जास्त वनडे सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये द्रविडचा स्ट्राइक रेट हा सर्वात कमी. तरीही तो एवढी मोठी कामगिरी कशी कशी करू शकला? किंवा तो एवढे जास्त सामने कसे खेळू शकला? तर त्याला कारण आहे द्रविडचा खेळ आणि स्वभावातील संयमीपणा.
त्यावेळी भारतीय संघाला पडझड हे नित्याचेच होते. त्यामुळे द्रविड सारख्या खेळ सांभाळणाऱ्या, धावसंख्येला आकार देणाऱ्या खेळाडूला कोण बाहेर ठेवणार. तेव्हा क्रिकेट हे निश्चित आजच्या सारखे नव्हते. एवढे सामने खेळून, क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात १० हजारपेक्षा अधिक धावा करूनही पुढे निवृत्तीसाठी त्यालाही आटापिटा करावा लागला. परंतु त्यानंतर पुन्हा पडद्यामागे गेलेला द्रविड उजेडात आला तो इंडिया अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेटपटुंचा प्रशिक्षक बनल्यामुळे.
काल जेव्हा टीम इंडियाने विश्वचषक जिंकला तेव्हा सर्वात जास्त कौतुक म्हणूनच राहुल द्रविडच्या वाट्याला आले. ३४४वनडे खेळून एकही विश्वचषक न जिंकण्याचं दुःख काय असत ते केवळ खेळाडूलाच माहित. मग हेच यश जर अशा रूपाने आले तर आणि आयुष्याच्या अशा वळणावर जेव्हा जगातील ९९.००% क्रिकेटपटू ह्याच क्षेत्रात वेगळंच काहीतरी करत असतात तेव्हा ह्या यशाची मजा नक्कीच काही खास.
परंतु यामुळे जेव्हा काल भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांची तुलना व्हायला लागली आणि त्यात शास्त्री यांना टार्गेट केले जाऊ लागले ते नक्कीच चुकीचे होते. आपण वरिष्ठ गटातली क्रिकेट आणि युवकांचे क्रिकेट, त्यातील यश-अपयश याची तुलना करू शकत नाही. कुणी कोणतेही मापदंड लावले तरी त्याची त्याची तुलना होऊ शकत नाही. एक प्रशिक्षक मातीपासून जसे मडके घडवतात तसा अगदी १५-१६व्या वयापासून १९व्या वयापर्यंत खेळाडू घडवतो. त्यांना मार्गदर्शन करतो तर दुसरा त्याच तयार झालेल्या मडक्याला पुढे कसे वापरायचे किती टिकवायचे हे ठरवतो. आणि हाच या दोन प्रशिक्षकांमधील मुख्य फरक आहे.
राहुल द्रविडचा स्वभाव शांत म्हणून रवी शास्त्रीवर अन्याय नको!
आपल्या देशात स्वभावामुळे खेळाडू किंवा अन्य व्यक्तिमत्व यांच्या कामगिरीवर आपण टीका करतो. परंतु कामगिरी आणि स्वभाव ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्री हे हेकेखोर आणि मनमानी करणारे प्रशिक्षक नक्की असतील. परंतु ते एक प्रशिक्षक म्हणून आजपर्यंत तरी कमी पडलेले नाहीत. त्यांची कामगिरी ही उच्च याच शब्दात मोजता येईल. अगदी दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभव जरी घेतला तरी ३ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघातील ६० खेळाडूंना बाद केले आहे आणि त्यातही वेगवान गोलंदाजांना हे यश मिळाले आहे. यात दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेनेही नेहमीप्रमाणे सफाईदार विजय मिळवले नाहीत.
रवी शास्त्री यांची आजपर्यंत कामगिरी आपणास नक्कीच माहित आहेच. मोठे असे अपयश हे ह्या प्रशिक्षकाने अजून तरी पाहिले नाही. एक स्वभाव चुकीचा म्हणून टीका होत असेल तर हे दुर्दैवीच आहे. आपण शांत आणि मितभाषी स्वभावाच्या खेळाडूंवर प्रेम करतो ते आपल्याला आपले वाटतात. यातून आपण खेळ आणि कामगिरीत सतत गल्लत करत असतो.
एका चांगल्या देशाचा २ महिन्यांचा दौरा आणि १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहे. वैयक्तिक मला तर १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक ही खूप छोटी गोष्ट वाटते. त्यापेक्षा द्रविड इंडिया अचा प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करतोय. १९ वर्षाखालील क्रिकेटपेक्षा इंडिया अ ही भारतीय संघात येण्याची खरी प्रयोगशाळा शाळा आहे.
रवी शास्त्री हे कसे प्रशिक्षक झाले, ते संघात खेळाडूंना स्थान देताना कसे वागतात हे सर्वाना माहित आहे. परंतु त्या त्या वेळी टीका करणारे चाहतेही शेवटी निकाल महत्वाचा असेच म्हणतात. याचकारणामुळे अन्य देशांच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकांसोबत शास्त्री यांनी तुलना करणे हे द्रविडशी तुलना करण्यापेक्षा कधीही योग्य ठरेल.
शेवटी हा सोशल माध्यमांचा काळ आहे. त्यामुळे यात भावनिक गोष्टींना जेवढे स्थान आहे तेवढे अन्य कोणत्याही गोष्टीला कदाचित नसेल. लगेच व्यक्त होणे, लगेच तुलना करणे ह्या गोष्टी या माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सर्वच घटकांकडून होताना दिसतात. त्याला मी किंवा अन्य कुणीही अपवाद नाही. परंतु तरीही दोन जेष्ठ खेळाडूंची, माजी कर्णधारांची आणि सध्याच्या प्रशिक्षकांची तुलना ही त्यांच्या कामगिरीवर न होता जर अन्य गोष्टींवर होत असेल तर आपण नक्कीच अजून क्रिकेटमध्ये तेवढे प्रगल्भ चाहते नाही आहोत असे स्पष्ट दिसते.