शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर ४ राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दौऱ्याबद्दल भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे.
द्रविडच्या मते यावेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन करु शकते. तसेच त्याने भारत कसोटी मालिका जिंकेल असा अंदाजही वर्तवला आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान आर अश्विन आणि बेन स्टोक्समधील चकमकही रोमांचकारी असेल, असेही द्रविडने म्हटले आहे.
द्रविडने २००७ साली कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची करामत केली होती. त्यानंतर मात्र, अजून भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
द्रविडने एका वेबिनारदरम्यान सांगितले की ‘मला खरंच वाटते की यावेळी भारताकडे सर्वोत्तम संधी आहे.’ हे वेबिनार कोविड-१९मुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या लाईव्ह एड इंडिया ट्रस्टने आयोजित केले होते.
द्रविड म्हणाला, ‘इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल कोणता प्रश्न उपस्थित होतच नाही. इंग्लंडने कसेही गोलंदाजी आक्रमण विशेषत: वेगवान गोलंदाजी आक्रमण उतरवले तरी ते चांगलेच असेल. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण जर तुम्ही त्यांच्या वरच्या सहा किंवा सात फलंदाजांना पाहिले तर तुम्ही एका विश्वस्तरिय फलंदाजाबद्दल विचार कराल आणि तो फलंदाज म्हणजे जो रुट.’
याबरोबरच द्रविडने असेही म्हटले की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारताकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करायला १ महिना आहे. अशा संधी खूप कमी वेळा येतात.
तसेच बेन स्टोक्स आणि अश्विन यांच्यातील लढाईबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, ‘नक्कीच त्यांच्याकडे दुसरा एक फलंदाज आहे तो म्हणजे बेन स्टोक्स, तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. पण मला वाटते की त्याच्याविरुद्ध अश्विन चांगली कामगिरी करेल. त्यांच्यातील लढाई रंगतदार व्हायला हवी. मला माहित आहे अश्विनने भारतात स्टोक्सविरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते. पण तरीही त्यांच्यातील स्पर्धा मनोरंजक असेल.’
तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यावर्षाच्या सुरुवातीला मिळवलेला विजय भारतासाठी आत्मविश्वास देणारा ठरेल, असेही द्रविडने म्हटले.
तो म्हणाला, ‘भारत खुप चांगल्या प्रकारे तयार असेल. त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा आत्मविश्वास आहे. खेळाडू स्वत:वर खूप विश्वास ठेवतात. काही खेळाडू यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळले आहेत. यावेळी आपली फलंदाजी बऱ्यापैकी अनुभवी आहे. त्यामुळे आपल्याकडे यावेळी सर्वोत्तम संधी आहे. भारत ही मालिका ३-२ अशा फरकाने जिंकू शकतो.’
भारताला इंग्लंड दौऱ्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
पाहाव ते नवलंच! चक्क हत्ती करतोय फलंदाजी, व्हिडिओ पाहून व्हाल चकीत
‘…तर बुमराह सहज ४०० कसोटी विकेट्स घेऊ शकतो’, महान वेगवान गोलंदाजाचे भाष्य