भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडला असे वाटते, की यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात आहेत. त्यामुळे कसोटी दौर्यावर भारताला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत चेंडू छेडछाडीच्या घटनेमुळे त्यांच्यावर १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. 2018 मध्ये स्मिथ (Steve Smith) आणि वॉर्नरचा (David Warner) ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश नव्हता. त्यामुळे भारताने त्यांच्याच देशात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती.
या दोघांच्या अनुपस्थितीत भारताने 2018-19 मध्ये पहिली कसोटी मालिका ऑस्ट्रेलियामध्ये जिंकली होती. फेसबुकवरील एका चॅनेलच्या ‘सोनी टेन पिट स्टॉप’ शोमध्ये द्रविड (Rahul Dravid) म्हणाला, “स्मिथ आणि वॉर्नरची कमतरता ऑस्ट्रेलियासाठी मोठी गोष्ट होती. कारण त्यांचा संघावर मोठा प्रभाव आहे. ते ऑस्ट्रेलियाचे दोन अव्वल फलंदाज आहेत. आणि ते संघासाठी सर्वाधिक धावा करतात.”
“आम्ही बघितलं आहे, की स्मिथ सारख्या खेळाडूचा ऍशेज मालिकेत काय प्रभाव होता. त्यावेळी वॉर्नर फॉर्ममध्ये नव्हता. पण तो मार्नस लॅब्यूशानेबरोबर (Marnus Labuschagne) मालिका पुढे घेऊन गेला होता. या दोघांच्या उपस्थितीत भारतासाठी हा दौरा खूप आव्हानात्मक असणार आहे,” असे पुढे बोलताना द्रविड म्हणाला.
भारत ऑस्ट्रेलियाबरोबर ३ डिसेंबर पासून ब्रिस्बेन येथे सुरू होत असलेल्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याने सांगितले, “विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या संघात ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर स्पर्धा करण्याची ताकद आहे. आणि त्यांच्याकडे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका चांगली व्हायला हवी. प्रत्येकजण ही
मालिका पाहण्यास उत्सुक आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी सामन्याचे वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केविन रॉबर्ट्स म्हणाले, “आरोग्यावर असलेल्या संकटामुळे आणि प्रवासावरील निर्बंधामुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो.”
भारताविरुद्ध कसोटी सामने-
पहिला कसोटी सामना- ३ ते ७ डिसेंबर, ब्रिस्बेन
दुसरा कसोटी सामना- ११ ते १५ डिसेंबर, ऍडलेड
तिसरा कसोटी सामना- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
चौथा कसोटी सामना- ३ ते ७ जानेवारी, सिडनी