भारत टी२० क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगलाच कामगिरी करत चर्चेत आला आहे, मात्र घरच्या मैदानावर कसोटीतील वर्चस्व संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्याचा प्रत्यय मागील काही मालिकांमध्ये आला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या कसोटीतील संघर्षाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. भारताचे काही खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतात. त्यामुळे कसोटीसाठी सराव करण्यास त्यांच्याकडे अधिक वेळ नसतो, असे विधान द्रविडने केले आहे.
भारताने मागील १२ वर्षापासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. त्यानंतर मात्र न्यूझीलंडविरुद्ध ३-० आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० अशा सलग कसोटी मालिका गमावल्या.
“प्रशिक्षक म्हणून एक गोष्ट मी जवळून पाहिली ती म्हणजे जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळतात, ते एकानंतर दुसऱ्याकडे प्रकाराकडे वळतात तेव्हा सरावासाठी वेळेचा प्रश्न असतो,” हे द्रविड बेंगलोर येथे त्याच्या ‘द राइज ऑफ हिटमॅन’ या पुस्तक लॉंचच्या कार्यक्रमात बोलत होता.
“एक काळ असा होता की भारत कसोटी सामन्याआधी तीन ते चार दिवस आधी पोहोचत आणि सरावाला सुरूवात करत असू. आता पाहिले तर काहींनी चार ते पाच महिन्यांआधी लाल चेंडूंचा सरावही केला नसेल”, असेही द्रविड म्हणाला. काही दिवसांपूर्वी भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल यानेही खेळाडूंना कसोटी सामन्यांचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यासाठी संघाच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली.
“आमच्या काळी आम्ही केवळ दोन क्रिकेटचे प्रकार खेळत होतो. तेव्हा फ्रॅंचायजी नावाचा प्रकारही नव्हता. तसेच तेव्हा कसोटी मालिकेचा सराव करण्यासाठी आमच्याकडे महिनाभराचा वेळ असायचा. त्यामध्ये मी माझ्या कौशल्यावर काम करत असे. तसेच त्याकाळी संघ प्रत्येक सामने नाहीतर कसोटी मालिका कशी जिंकता येईल हे प्रयत्न करत असत. आता मात्र त्यात बदल झाला आहे.
“कसोटी चॅम्पियनशीपमुळे घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत सर्व सामने कसे जिंकता येईल याचे दडपण असते,” असेही द्रविड पुढे म्हणाला.
ताज्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे. २०२७च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला उत्तम खेळत सामने जिंकणे महत्वाचे आहे. भारताच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक पद गौतम गंभीर सांभाळत आहे. त्याआधी २०१९-२१ आणि २०२१-२३च्या दोन्ही कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत भारत पोहोचला होता. तसेच भारताने ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका जिंकली होती.






