रविवारी (२७ सप्टेंबर) शारजाह येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएल २०२०चा ९वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान संघाने पंजाबचे डोंगराएवढे आव्हान पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला. झाले असे की, पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २२३ धावा केल्या. राजस्थान संघाने हे भलोमोठे आव्हान केवळ १९.३ षटकातच पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
अशात राजस्थानचा युवा खेळाडू राहुल तेवतियाने कमालीचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या धुरंधर खेळाडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ ३१ चेंडूत ५३ धावा कुटल्या. दरम्यान तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात तब्बल ५ षटकार ठोकले. तेवतियाच्या या शानदार पराक्रमामुळे त्याचे नातेवाईक आणि ओळखीचे व्यक्ती असे मिळून जवळपास ४०० लोक त्याच्या राहत्या घरी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. एवढेच नव्हे तर, सोबतच त्याच्या वडिलांना इतके जास्त लोक फोन करु लागले की, वैतागून त्यांना त्यांचा फोन बंद करुन ठेवावा लागला.
२७ वर्षीय फिरकी गोलंदाज तेवतिया याचा जन्म दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबाद शहरातील सेक्टर-८ सिही या गावात झाला होता. त्याचे वडील कृष्णपाल तेवतिया हे फरीदाबाद कोर्ट येथे वकील आहेत.
तेवतियाविषयी बोलताना त्याच्या वडिलांनी सांगितले की, “तेवतियामधील प्रतिभेला समजून घेऊन त्याला भविष्यात क्रिकेटपटू बनवण्यात २ लोकांनी महत्त्वाचा वाटा उचलला. ते २ व्यक्ती म्हणजे, तेवतियाचा लहान भाऊ धर्मवीरचा मित्र मुकेश आणि माजी क्रिकेटपटू विजय यादव.”
तेवतियाला लहानपणी क्रिकेट खेळताना पाहून मुकेशने त्याला भविष्यात क्रिकेटपटू बनवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कृष्णपाल यांनी त्याला २००१साली गुरुकुलला घेऊन गेले. तिथे यादव यांनी तेवतियामधील प्रतिभेला हेरले आणि त्याला गोलंदाजीबरोबर फलंदाजी देखील करण्यास सांगितले. जेणेकरुन तो भविष्यात एक दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू बनावा.
“तेवतियाला घेऊन जेव्हा त्याचे वडील पहिल्यांदा माझ्याकडे आले होते, तेव्हा तो केवळ ८ वर्षांचा होता. तेव्हा त्याला फक्त लेग स्पिन गोलंदाजी करता येत होती. त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर मला जाणवले की, तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. मी त्याला सहज एका सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी पाठवले आणि त्या सामन्यात त्याने संघाला आपल्या फलंदाजीने विजय मिळवून दिला. म्हणून पुढे जाऊन मी त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीचा सराव करण्यास सांगितले,” असे माजी क्रिकेटपटू विजय तेवतियाविषयी बोलताना म्हणाले होते.
तसेच पुढे त्यांनी म्हटले की, “तेवतियाने १५, १९ आणि २२ वर्षांखालील क्रिकेट खेळले होते. तरिही त्याला हरियाणा रणजी संघात स्थान मिळवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्यावेळी हरियाणा संघात जयंत यादव, राहुल चाहर आणि अमित मिश्रा हे ३ लेग स्पिनर उपलब्ध होते. त्यामुळे तेवतिया आणि त्याचे वडील खूप निराश झाले होते. पण मी त्याला धीर देत म्हणालो की, तूला तुझ्या फलंदाजीमुळे संघात स्थान मिळू शकते. म्हणून तेवतियाने त्याच्या फलंदाजीवर काम केले आणि पुढे त्याला केवळ रणजी ट्रॉफी संघात नव्हे तर आयपीएलमध्येही स्थान मिळाले.”
२०१८ साली तेवतियाच्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. २०१४ सालीच राजस्थान रॉयल्स संघाने त्याची निवड केली होती. पण त्यावेळी तेवतिया जास्त चांगले प्रदर्शन करु शकला नव्हता. पण २०१८ साली पुन्हा आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ३ कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांनीही त्याची बोली लावली होती. पुढे २०२०सालच्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला ३.६० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात दाखले केले.
आतापर्यंत तेवतियाने आयपीएलमध्ये एकूण २२ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १७४ धावा आणि १७ विकेट्सची कामगिरी केली आहे. तसेच त्याने ७ प्रथम श्रेणी सामन्यात १९० धावा आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. तर २१ अ दर्जाच्या सामन्यात ४८४ धावा व २७ विकेट्स आणि ५० देशांतर्गत टी२० सामन्यात ६९१ धावा व ३३ विकेट्सची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ती योजना फसली आणि आम्ही सामना गमावला, हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया
IPL 2020 : काय सांगता! त्याने एक-दोन नाही तर तब्बल ७ चेंडू टाकले ‘यॉर्कर’
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्सची माघार
ट्रेंडिंग लेख-
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार






