पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत अजय बोरुडेच्या उपयुक्त ३३ धावांसह तनय संघवी(२-२०) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाचा २ धावांनी पराभव करत शेवट गोड केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत रायगड रॉयल्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ९ षटकांचा खेळविण्यात आला. रायगड रॉयल्स संघाने ९ षटकात ९बाद १०९धावा केल्या. सलामीची जोडी सिद्धेश वीर(०), मेहुल पटेल(१) हे स्वस्तात तंबूत परतले. नौशाद शेखने ९चेंडूत ५चौकाराच्या मदतीने २३धावा, विशांत मोरेने १९ धावा काढून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर मधली फळी फारशी खेळी करू शकली नाही. अजय बोरुडेने १३चेंडूत ३३धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ५चौकार व १षटकार मारत संघाला १०९धावांचे आव्हान उभे केले.
१०९ धावांचे आव्हान पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला ९षटकात ६बाद १०७ धावाच करता आल्या. सलामवीर अंकित बावणे ८धावांवर बाद झाला. मनोज इंगळेने अंकितला झेल बाद केले. त्यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठीने २६चेंडूत ६४धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ६चौकार व ५ षटकार ठोकून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. त्याला योगेश डोंगरेने १२चेंडूत ३षटकाराच्या मदतीने २५ धावा काढून साथ दिली. शेवटच्या षटकात कोल्हापूर टस्कर्सला विजयासाठी ७धावांची आवश्यकता होती. तनय संघवीच्या पहिल्याच चेंडूवर राहुल त्रिपाठी त्रिफळा बाद झाला. त्यानंतर तनयने या षटकात ४धावा देत संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला. रायगड रॉयल्स संघाला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पीबीजी कोल्हापूर टस्कर्सला निर्धारित षटकात ८५ धावांवर रोखणे आवश्यक होते. परंतु कोल्हापूर टस्कर्स संघाने ८५ धावांचा टप्पा पूर्ण करून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.
क्वालिफायर १ लढत रत्नागिरी जेट्स वि.ईगल नाशिक टायटन्स यांच्यात १९ जुन २०२४रोजी सायंकाळी ७ वाजता, तर एलिमिनेटर १ लढत छत्रपती संभाजी किंग्स वि.पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यात २० जुन रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
रायगड रॉयल्स: ९षटकात ८बाद १०९धावा(अजय बोरुडे ३३(१३,५x४,१x६), नौशाद शेख २३, विशांत मोरे १९, ऋषभ राठोड १०, श्रीकांत मुंढे ३-२०, निहाल तुसामद २-१६, श्रेयस चव्हाण १-११) वि.वि.पीबीजी कोल्हापूर टस्कर्स: ९षटकात ६बाद १०७ धावा(राहुल त्रिपाठी ६४(२६,६x४,५x६), योगेश डोंगरे २५(१२,३x६), तनय संघवी २-२०, विकी ओस्तवाल १-२३, मनोज इंगळे १-२३); सामनावीर – अजय बोरुडे.