---Advertisement---

MPL 2025: कॅप्टनच्या खेळीवर गोलंदाजांचा कळस, रायगड रॉयल्सचा विजयी शुभारंभ

On: गुरूवार, जून 5, 2025 7:43 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा हंगामातील दुसरा सामना खेळला गेला. रायगड रॉयल्स व सातारा वॉरियर्स यांच्यातील या सामन्यात रायगड ‌संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सातारा संघ 24 धावांनी मागे राहिला. यासह रायगडने प्रथमच हंगामाची सुरुवात विजयाने केली. रायगडचा कर्णधार ऋषभ राठोड सामनावीर ठरला.

हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात साताऱ्याचा कर्णधार सौरभ नवले याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. साताऱ्याचे वेगवान गोलंदाज वैभव दरकुंडे व राजवर्धन हंगरगेकर यांनी पहिल्या पाच षटकातच 42 धावांवर रायगडचे चार फलंदाज बाद केले. त्यानंतर कर्णधार ऋषभ राठोड व ऋग्वेद मोरे यांनी डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 130 धावांची मोठी भागीदारी उभारली. ऋग्वेद याने 41 चेंडूंमध्ये तीन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. तर, ऋषभ याने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 45 चेंडूंवर 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. त्यांच्या खेळामुळे रायगडने 190 पर्यंत मजल मारली. सातारा संघासाठी राजवर्धन हंगरगेकर याने 3 बळी टिपले.

विजयासाठी मिळालेले 191 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या साताऱ्याचा उपकर्णधार पवन शहा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर, कर्णधार सौरभ नवले हा देखील केवळ नऊ धावा करू शकला. मधल्या फळीत हर्षल काटे (38 धावा), ओम भोसले (45 धावा) व मेहुल पटेल (26 धावा) यांनी योगदान दिले. मात्र, रायगडच्या नियंत्रित गोलंदाजे पुढे त्यांना मोठे फटके खेळणे अवघड गेले. अखेरीस अनिकेत पोरवाल याने केवळ 14 चेंडू 31 धावा करत संघर्ष केला. मात्र, त्यांचे प्रयत्न 24 धावांनी कमी पडले. रायगडसाठी निखिल कदम यांनी सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर, सागर जाधव व तनय संघवी यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---