धरमशाला येथे रविवारी (२२ ऑक्टोबर) झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विराट कोहलीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाही त्याच्या खेळीवर खूप प्रभावित झाला आहे. त्याने विराट कोहलीचे भरभरून कौतुक केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. षटकार मारून तो आपले शतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला होता, पण तोपर्यंत त्याने आपले काम केले होते, कारण भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ होता. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची धुरा सांभाळत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता.
सुरेश रैना (Suresh Raina) याच्या मते, विराट कोहली सध्या वेगळ्याच पातळीवर फलंदाजी करत आहे. इंडिया टुडेशी बोलताना तो म्हणाला, “विराट कोहली वेगळ्या झोनमध्ये आहे. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तो त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत आहे आणि संघाची जबाबदारीही घेत आहे. आज त्याने केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रवींद्र जडेजासोबत उत्कृष्ट भागीदारी करणे. आता जडेजानेही धावा केल्या आहेत आणि त्याला विराट कोहलीकडून तो आत्मविश्वास हवा होता.”
धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या 21व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 273 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने 48 षटकांत 6 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. 2003 नंतर भारतीय संघाने आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत न्यूझीलंडचा पहिला पराभव केला आहे. 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाने शेवटचा न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. (Raina was happy with Kohli tremendous innings said after the match this is a big thing)
महत्वाच्या बातम्या –
किंग कोहलीचा वनडेत ‘विराट’ विक्रम, ‘या’ बाबतीत श्रीलंकन दिग्गजाला टाकलं मागे
इंग्लंडच्या कमबॅकची जबाबदारी घातक गोलंदाजाच्या खांद्यावर, रिस टोपलीच्या जागी मिळाली विश्वचषक खेळण्याची संधी