आयपीएलच्या पहिल्याच मोसमाचे विजेतेपद मिळवून राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. पण असे असले तरी राजस्थानकडून अनेक दिग्गज खेळाडू खेळले. त्यांनी संघाकडून चांगली कामगिरीही केली. मात्र राजस्थानला सांघिक कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्यांना पहिल्या मोसमानंतर मोठे यश मिळवण्यात अपयश आले. पण राजस्थानकडून शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विचार करुन त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ बनवण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
सलामीवीर – अजिंक्य रहाणे आणि शेन वॉट्सन
२०११ पासून २०१९ पर्यंत अजिंक्य रहाणे राजस्थानकडून खेळला आहे. यामध्ये केवळ २०१६ आणि २०१७ च्या मोसमात बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान संघावर बंदी आल्याने तो रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळला. तसेच २०२० आयपीएलसाठी राजस्थानने त्याचे ट्रेडिंग दिल्ली कॅपिटल्सबरोबर केले आहे. पण असे असले तरी रहाणे या काही वर्षांत राजस्थानचा महत्त्वाचा भाग होता. तो राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणाही फलंदाज आहे. त्याने १०६ सामने राजस्थानकडून खेळताना ३५.६० च्या सरासरीने ३०९८ धावा केल्या आहेत.
याबरोबरच राजस्थानकडून खेळताना अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सननेही शानदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या शानदार फॉर्ममध्ये असताना राजस्थानकडून खेळला. तो २००८ ते २०१५ दरम्यान खेळला. या कालावधीत त्याने ८४ सामन्यात ३५.८५ च्या सरासरीने २४७४ धावा राजस्थानकडून खेळताना केल्या आहेत. तो राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा रहाणे नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तसेच त्याने ६७ विकेट्सही घेतल्या असून तो राजस्थानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
मधली फळी – राहुल द्रविड, स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जॉस बटलर
राहुल द्रविड जरी टी२० क्रिकेटसाठी फिट बसत नसला तरी त्याच्याकडे मधली फळी सांभाळण्याची क्षमता आहे. तसेच त्याने राजस्थानकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने राजस्थानकडून ५२ सामने खेळताना २७.०२ च्या सरासरीने ७ अर्धशतकांसह १३२४ धावा केल्या आहेत. त्याला साथ द्यायला मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करु शकणारे स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन आणि जॉस बटलर आहेत.
स्मिथने राजस्थानकडून ३६ सामने खेळले असून ३३ च्या सरासरीने ७५९ धावा केल्या आहेत. तसेच सॅमसनने ७१ सामन्यात राजस्थानकडून खेळताना २८.७३ च्या सरासरीने १७२४ धावा केल्या आहेत. तो राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
याबरोबरच राजस्थानकडे जॉस बटलर देखील आहे. त्याने २०१९ ला त्याच्या आक्रमक फलंदाजांनी आयपीएलचा १२ वा मोसम गाजवला होता. त्याने २०१८ आणि २०१९ असे २ आयपीएल मोसम राजस्थानकडून खेळताना ४७.७२ च्या सरासरीने ८५९ धावा केल्या आहेत.यामध्ये त्यानेे ८ अर्धशतके केली आहेत.
अष्टपैलू – युसुफ पठाण
युसुफ पठाणकडे तळातील फलंदाजी सांभाळण्याची आणि गरज पडल्यास फिरकी गोलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता आहे. २००८ च्या अंतिम सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध केलेले आक्रमक अर्धशतक राजस्थानला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले होते. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही त्याने मिळवला आहे. युसुफने राजस्थानकडून ४३ सामन्यात १०११ धावा केल्या आहेत. तसेच २० विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाज – शेन वॉर्न, सिद्धार्थ त्रिवेदी,मुनाफ पटेल, श्रेयस गोपाळ
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तर गाजवलेच पण त्याच्याच नेतृत्वाखाली राजस्थानने पहिल्या आयपीएलचे विजेतेपदही मिळवले. वॉर्नचे राजस्थानच्या यशात मोठे योगदान राहिले आहे. त्याने २००८ ते २०११ दरम्यान ५६ सामन्यात खेळताना ५८ विकेट्स घेतल्या आहेत. तो राजस्थानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
तसेच सिद्धार्थ त्रिवेदीनेही राजस्थानकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. तो राजस्थानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असून त्याने ७६ सामन्यात ६५ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय राजस्थानकडे मुनाफ पटेल आणि युवा गोलंदाज श्रेयस गोपाळ देखील आहेत. मुनाफने राजस्थानकडून २००८ ते २०१० दरम्यान ३१ सामने खेळताना ३३ विकेट्स घेतल्या आहेत. तर गोपाळ राजस्थानकडून २०१८ पासून खेळत असून त्याने २५ सामन्यात १८.८० च्या सरासरीने ३१ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
वनडे क्रिकेटमधील ५ सुपर हिरो, जे टी२०मध्ये ठरले झिरो
इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?
हे ४ भारतीय आहे ज्यांनी वनडेत गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते