आयपीएलमध्ये मंगळवारी (6 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमने सामने येतील. या हंगामात राजस्थान रॉयल्सने 4 सामने खेळले आहेत. सलग दोन सामने जिंकून राजस्थानने या हंगामाची चांगली सुरुवात केली होती. मात्र या संघाने खेळलेल्या मागील दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघात काही बदल होण्याचे संकेत राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिले आहेत.
इंग्लंडचा स्टार फलंदाज व राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलर (तीन सामन्यांत 47 धावा) आणि राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (चार सामन्यांत एक विकेट) या दोघांचाही खराब फॉर्म या संघासाठी चिंतेचा विषय आहे. युवा फलंदाज रियान पराग यानेदेखील अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. अशा परिस्थितीत राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ त्याच्या जागी सलामीवीर यशस्वी जयस्वालला संधी देऊ शकतो. जर असे झाले तर स्मिथ स्वत: मधल्या फळीत फलंदाजीस येईल.
मुंबईविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी स्मिथ म्हणाला, “मागील दोन्ही सामन्यात मी अपयशी ठरलो होतो. मुंबईविरुद्ध मी मोठी खेळी खेळण्यासाठी तयार आहे. सामन्याआधी आम्ही काही योजना केल्या आहेत. या योजनेनुसार संघात काही नवीन खेळाडूंना स्थान मिळू शकते.”
वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला पॉवरप्लेमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्ये अद्यापही चांगली कामगिरी करता आलेली नाही. ज्यामुळे वेगवान गोलंदाज टॉम करन आणि जोफ्रा आर्चर यांच्यावर दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत कर्णधार स्मिथ भारतीय वेगवान गोलंदाज वरुण एरॉन किंवा युवा प्रतिभावान गोलंदाज कार्तिक त्यागी याला संधी देऊ शकतो.
असा असू शकते राजस्थान रॉयल्सचा आजचा संभावित ११ जणांचा संघ –
जॉस बटलर(यष्टीरक्षक), यशस्वी जैयस्वाल, संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ(कर्णधार), रियान पराग, मनिपाल लोमरोर, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण ऍरॉन.