सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका बसला आहे. त्याचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलच्या १३ व्या हंगामात खेळताना दिसणार नाही. या वेगवान गोलंदाजाला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान हिप इंज्यूरी झाली. त्यामुळे तो त्या सामन्यात आपले षटक देखील पूर्ण करू शकला नव्हता आणि आता तो संपूर्ण हंगामातूनच बाहेर पडला आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून यामध्ये त्यांना २ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. संघ ४ गुणांसह सातव्या स्थानी आहे. आता भुवनेश्वर कुमार आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर संघामध्ये एका उत्तम गोलंदाजांची कमतरता जाणवेल.
त्यामुळे संघ व्यवस्थापन आता भुवनेश्वर कुमारच्या जागी एका वेगवान गोलंदाजाला घेण्याचा प्रयत्न करेल. पण याचबरोबर कदाचित संघव्यवस्थापन अशा खेळाडूचाही विचार करु शकतात जो गोलंदाजीबरोबरच मधल्या फळीत फलंदाजी करु शकतो. या लेखात त्या ३ भारतीय खेळाडूंची नावे सांगणार आहोत, जे भुवनेश्वर कुमार ऐवजी सनरायझर्स हैदराबाद संघात निवडले जाऊ शकतात.
युसुफ पठाण
युसुफ पठाण गेली दोन वर्षे सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. परंतु, यंदाच्या आयपीएलसाठी त्याला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. मात्र, आता हैदराबाद संघात भुवनेश्वर ऐवजी युसुफ पठाणसारख्या अनुभवी खेळाडूचा समावेश होऊ शकेल जो शेवटच्या षटकांत स्फोटक फलंदाजी करू शकेल.
नुकताच हैदराबाद संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध शारजाहसारख्या छोट्या मैदानावर सामना जिंकू शकला नाही. यावेळी युसुफ पठाणसारखा फलंदाज शेवटच्या षटकांत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. याशिवाय पठाण हा ऑफस्पिन गोलंदाजी देखील करू शकतो.
त्याने आयपीएलमध्ये एकूण १७४ सामने खेळले असून ३२०४ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत त्याने ४२ बळी मिळवले आहेत.
विनय कुमार
सनरायझर्स हैदराबाद संघ भुवनेश्वर कुमारच्या जागी सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज विनय कुमार याची देखील निवड करू शकतात. हा दिग्गज वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोची टस्कर्स केरळ, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाकडून खेळला आहे.
विनय कुमारने १०५ आयपीएल सामन्यात १०५ बळी घेतले आहेत. रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या मोसमात पुडुचेरीकडून त्याने चमकदार कामगिरी केली आणि शेवटच्या प्रथम श्रेणी सामन्यात अर्धशतकही केले. भुवनेश्वर कुमारचा पर्याय म्हणून विनय चांगला गोलंदाज असल्याचे सिद्ध होऊ शकतो.
रोहन कदम
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत युवा खेळाडूंना बरीच संधी दिली आहे. त्यांनी मध्यक्रमात अब्दुल समद, प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा असे युवा खेळाडू खेळताना दिसले. तर आता हैदराबाद संघ भुवनेश्वर ऐवजी रोहन कदम या एका युवा खेळाडूला संघात सामील करून घेऊ शकतो.
रोहन कदम याने २० टी-२० सामन्यात ४९.६२ च्या सरासरीने ७९४ धावा केल्या आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईविरुद्ध ७१ धावा ठोकल्या. याव्यतिरिक्त तो लेगस्पिन गोलंदाज म्हणूनही कामगिरी बजावू शकतो.