आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अखेर कडक पाऊल उचलत बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर केले असून त्यांच्या जागी स्कॉटलंडची निवड केली आहे. मात्र, क्रिकेटमधील गोंधळ इथेच थांबलेला नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (PCB) अजब भूमिका घेतली आहे. आज (24 जानेवारी 2026) एका पत्रकार परिषदेत पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी सर्वांनाच धक्का दिला.
मोहसिन नकवी लाहोरमध्ये म्हणाले की, आम्ही टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याचा निर्णय आमचे सरकार घेईल. आमचे पंतप्रधान सध्या देशाबाहेर आहेत. ते परतल्यावर आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करू. जर सरकारने परवानगी नाकारली, तर आयसीसीने खुशाल 22 व्या संघाला (दुसऱ्या देशाला) स्पर्धेत बोलवावे.
जर पाकिस्तानने या स्पर्धेत सहभाग घेतला नाही, तर त्यांच्या क्रिकेट बोर्डाला केवळ खेळाचंच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही मोठा फटका बसेल. स्पर्धेत खेळण्यासाठी मिळणारी मोठी रक्कम गमवावी लागेल. स्पर्धेतील कामगिरीनुसार मिळणाऱ्या खात्रीशीर रकमेवर पाणी सोडावे लागेल. सामने जिंकल्यावर मिळणारा बोनस मिळणार नाही. खेळाडूंच्या मानधनावर आणि अनुभवावर याचा वाईट परिणाम होईल. प्रायोजक आणि प्रसारक कंपन्यांकडून मिळणारा मोठा निधी थांबेल. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसी पाकिस्तानवर मोठा आर्थिक दंड किंवा बंदीही घालू शकते. पाकिस्तानने घेतलेली ही भूमिका त्यांच्या स्वतःच्या क्रिकेटच्या भवितव्यासाठी धोक्याची ठरू शकते.






