भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंडर-19 वर्ल्डकप 2026 मधील सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव केला. न्यूझीलंड संघाविरूद्ध सामन्यात विजय मिळवत भारताने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले आहेत. बुलावायोमध्ये झालेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने सामना 37 षटकांचा खेळवण्यात आला. सुरूवातीला गोलंदाजीत तर नंतर वैभव-आयुषच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दणदणीत विजयाची नोंद केली.
आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अंडर10 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सर्व तीन सामने जिंकत आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडियाने अमेरिका व बांगलादेशविरूद्ध सामन्यातील विजयानंतर सुपर-6 मध्ये धडक मारली होती. आता न्यूझीलंडविरूद्ध सामना जिंकत संघ गट टप्प्यातील गुणतालिकेत पहिल्या स्थानी राहणार आहे.
बुलावायोमध्ये पावसामुळे सामन्याची नाणेफेक उशिरा झाली. त्यामुळे सामना सुरूवातीला 47 षटकांचा करण्यात आला. पण यानंतर पहिल्या डावातील 8 षटकं झाल्यानंतर सामना पावसामुळे थांबवण्यात आला आणि बऱ्याच वेळाने सामना सुरू झाल्याने 37 षटकांचा सामना खेळवला गेला.
डीएलएस पद्धतीनुसार भारताला विजयासाठी 37 षटकांत 130 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. या सामन्यात आरोन जॉर्जला प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केल्यामुळे वैभव सूर्यवंशीसह तो सलामीला उतरला. पण एक षटकार लगावल्यानंतर तो दुसऱ्या षटकात झेलबाद झाला. यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेला सूर गवसला आणि त्याने वादळी अर्धशतकी खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीनेही त्याला चांगली साथ दिली.
वैभव व आयुष यांनी 39 चेंडूत 76 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. वैभव सूर्यवंशी 23 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांसह 40 धावांची खेळी केली. तर कर्णधार आयुष म्हात्रेने 27 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारांसह 53 धावांची खेळी करत बाद झाला. यानंतर विहान मल्होत्रा व वेदांत त्रिवेदी यांनी 29 धावांची भागीदारी करत नाबाद राहत संघाला 13.3 षटकांत विजय मिळवून दिला.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. न्यूझीलंडचा संघ 36.2 षटकांत सर्वबाद झाला. न्यूझीलंडची टॉप फलंदाजी फळी भारताच्या गोलंदाजीसमोर फेल ठरली. 100 धावांच्या आत संघाने 6 विकेट्स गमावले होते. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर टिकत संघाला 100 धावांच्या पलीकडे नेलं. जेकब कॉटरने 23 धावा, जसकरन संधू 28 धावा, कॅलम सॅमसन नाबाद 37 धावा तर सेल्विन संजयने 28 धावांची खेळी करत संघाला 135 धावांपर्यंत नेलं.






