भारत देशात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट पसरली आहे. या महामारीमुळे दररोज हजारोंच्या संख्येत लोकांचे बळी जात आहेत. अशात इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला मनन वोहरा याच्यासाठी दु:खद वृत्त पुढे आले आहे. त्याचे आजोबा यश पाल वोहरा यांचे काल (३० एप्रिल) कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते.
माजी हॉकीपटू आणि क्रीडा प्रशासक असलेले यश पाल वोहरा यांना काही दिवसांपुर्वी कोविड-१९ ची लागण झाली होती. त्यांच्यासोबत मनन वोहराचे आई-वडीलही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. पुढे उपचारानंतर मनन वोहराचे आई-वडील कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. परंतु कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्याचे आजोबा मात्र पराभूत झाले.
मनन वोहराचा धाडसी निर्णय
राजस्थान रॉयल्सचा हा सलामीवीर आपल्या जिवलग आजोबांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:खी झाला आहे. त्याला आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला आपल्या घरी जायचे होते. यासाठी त्याने आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यात सोडून माघार घेण्याचीही तयारी केली होती. परंतु त्याचे वडील संजीव वोहरा यांनी त्याची समजूत काढली.
हिंदुस्तान टाइम्सने संजीव वोहरा यांच्या हवाल्याने लिहिले आहे की, ‘मी त्याला (मनन वोहरा) त्याच्या दिवंगत आजोबांची इच्छा पूर्ण करायला सांगितली. माझे वडील अर्थात यश पाल वोहरा यांची इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतर मननने आयपीएल सोडून घरी न येता, संघासोबतच थांबावे. कारण तो आयपीएल सोडून घरी आला असता तर त्याला पुन्हा संघासोबत सामील होणे अवघड गेले असते.’
मनन वोहराची आयपीएल कारकिर्द
२७ वर्षीय मनन वोहराच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, या हंगामात त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. दरम्यान तो अवघ्या ४२ धावा करु शकला आहे. तर पूर्ण आयपीएल कारकिर्दीत ५३ सामने खेळताना त्याने १०५४ धावा चोपल्या आहेत. दरम्यान ९५ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत: ९१ धावांची धमाकेदार खेळी करुनही राहुलने ‘या’ खेळाडूंना म्हटले मॅच विनर