रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना अतिशय चित्तथरारक राहिला. ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीकडून रजत पाटीदार याने नाबाद ११२ धावा केल्या आणि संघाला १४ धावांनी हा सामना जिंकून देण्यात योगदान दिले. एका रात्रीत सुपस्टार झालेला रजतबाबत आता त्याच्या वडिलांनीच एक नवा खुलासा केला आहे.
वडिलांनी केला खुलासा
एलिमिनेटरमधील शानदार शतकानंतर रजतचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “तो कमीत कमी अर्धशतक बनवेल अशी आम्हाला नक्की अपेक्षा होती. मात्र, शतक ठोकून त्याने आम्हाला सुखद धक्का दिला.”
इंदोरमध्ये मोटर पंपचे व्यावसायिक असलेल्या मनोहर पाटीदार यांनी पुढे बोलताना म्हटले,
“यावर्षी लिलावात न विकला गेल्याने तो काहीसा निराश होता. तरीही त्याने सरावातून लक्ष काढले नाही. आम्ही ९ मे रोजी त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एक हॉटेलही बुक केले गेलेले. मात्र, तीन एप्रिल रोजी त्याला आरसीबीकडून बोलावणे आल्याने आम्ही, हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.”
रतलाम येथील एका मुलीशी रजतचे लग्न ठरले आहे. मात्र, आता आयपीएल व त्यानंतर रणजी ट्रॉफीच्या नॉक आउट मॅचेसनंतर जुलै महिन्यात हा समारंभ पार पडेल, असे पुढे मनोहर पाटीदार यांनी सांगितले.
रजत २०२२ आयपीएलसाठी आरसीबीच्या संघात नव्हता. मात्र, लवनिथ सिसोदिया दुखापतग्रस्त झाल्याने त्याला बेस प्राईसमध्ये आरसीबीने बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले. मागील वर्षी देखील रजत आरसीबीसाठी ४ सामने खेळला होता.
ठरला आरसीबीच्या विजयाचा नायक
एलिमिनेटर सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर रजत फलंदाजीसाठी उतरला होता. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत ५४ चेंडूवर १२ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ११२ धावांची शानदार खेळी केली. या हंगामात त्याने आत्तापर्यंत ७ सामन्यात १५६ च्या स्ट्राईक रेटने २७५ धावा बनवल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“राहुल जबाबदारी उचलण्यास पात्र नाही”; माजी भारतीय क्रिकेटरचे टीकास्त्र
शतक एक विक्रम अनेक! रजत पाटीदारच्या जबराट सेंच्युरीने पाडला विक्रमांचा पाऊस, टाका एक नजर
पोलिसवाला की जॉन सीना? एलिमिनेटरमधील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल