मुंबई । भारताचे माजी रणजी क्रिकेटपटू राजिंदर गोयल यांचे रविवारी वयाच्या 77 वर्षी निधन झाले. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल क्रिकेटरसोबत एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे.
आपल्या फिरकीने स्थानिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या गोयल यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. गोयल बिशन सिंग बेदी यांच्या काळात क्रिकेट खेळत होते. बेदी हे त्या काळात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सांभाळत होते. बेदी हे गोलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करत असल्याने गोयल यांना जास्त संधी मिळाली नाही. गोयल यांच्याकडे गोलंदाजीचे मोठे स्पेल करण्याची क्षमता होती.
गोयल हे हरियाणाच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व करत होते. गोलंदाजीस अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर त्यांनी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवले. त्यांची गोलंदाजी खेळून काढणे अनेकांना जड जायचे. ते दीर्घकाळ स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना दिसून आले. पण दुर्दैवाने एकही आंतरराष्ट्रीय सामना त्यांना खेळता आला नाही.
BCCI mourns the sad demise of Shri Rajinder Goel.https://t.co/DeGS2mvsXI pic.twitter.com/2v6EwfTKXy
— BCCI (@BCCI) June 21, 2020
राजिंदर गोयल हे असे पहिले क्रिकेटपटू होते ज्यांना चक्क एका डाकूने अभिनंदन करणारे पत्र लिहिले होते. हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. 1985 साली भूरासिंग यादव या डाकूने ग्वाल्हेरमध्ये तुरुंगवासात असताना गोयल यांना रणजी चषकात 600 बळी घेण्याचा विक्रम केल्यानंतर अभिनंदन करणारे पत्र दिले होते.
भूरासिंगने या पत्रात लिहले की, ” मी तुमचा खूप मोठा चाहता असल्याने हे पत्र लिहित आहे. भविष्यात ईश्वर आपल्याला असेच यश देत राहो.” हे पत्र 8 एप्रिल 1985 साली लिहिले होते. हे पत्र वाचून गोयल यांच्या डोळ्यात अश्रू आले.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हरियाणाने 1991 साली मुंबईला हरवून रणजी चषक जिंकला होता. त्यावेळी गोयल निवड समितीचे अध्यक्ष होते.
वयाच्या 44 वर्षांपर्यंत ते प्रथम श्रेणीचे सामने खेळत राहिले. गोयल यांची पत्नी आणि मुलगा हे देखील प्रथम श्रेणीचे क्रिकेट सामने खेळले आहेत. मुलगा नितीन गोयल हे सध्या स्थानिक सामन्यात मॅच रेफ्री म्हणून काम पाहतात.
1958-59 ते 1984-85 पर्यंत त्यांनी हरियाणा संघाकडून क्रिकेट खेळले. रणजी चषकातील एकूण 26 हंगामात त्यांनी 637 बळी टिपले. तसेच प्रथम श्रेणीच्या 157 सामन्यात 750 बळी टिपले.
ट्रेंडिंग घडामोडी –
भारत म्हणजे मॅच फिक्सिंगचा अड्डा, पहा कुणी केली ही विषारी टीका
भारताकडून एकेवेळी जबरदस्त गोलंदाजी केलेला खेळाडू म्हणतो, माझाही सुशांत सिंग रजपूत केला होता
ड्युमिनी म्हणतो, त्या भारतीय फलंदाजांच्या पुल शाॅटचा दिवाना