आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. यासह केकेआर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे.
सामन्याच्या सुरुवातीला पावसानं खोळंबा घातल्यानं हा सामना 16-16 षटकांचाच करण्यात आला होता. या सामन्यानंतर केकेआरचा एक खेळाडू चर्चेचा विषय बनला आहे, तो म्हणजे रमणदीप सिंग. केकेआरचा या अष्टपैलू खेळाडूला आयपीएलची आचारसंहिता मोडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागेल.
रमणदीपनं आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला, असं आयपीएलनं रविवारी एका निवेदनात सांगितलं. 27 वर्षीय रमणदीपनं आपली चूक मान्य करत मॅच रेफरीचा निर्णय मान्य केला आहे. आयपीएलच्या कलम 2.20 मध्ये अशा कृतींचा समावेश आहे, जे खेळाच्या परिघाच्या बाहेरची आहे. जसे की विकेटला लाथ मारणे, किंवा जाहिरात फलक, ड्रेसिंग रूमचे दरवाजे, आरसे, खिडक्या आणि इतर वस्तूंचे नुकसान करणे इत्यादी.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात रमणदीपनं आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं. प्रथम फलंदाजी करताना कोलकातानं 16 षटकांत 7 गडी गमावून 157 धावा केल्या. यामध्ये रमणदीप सिंगच्या अवघ्या 8 चेंडूत नाबाद 17 धावांचं महत्वाचं योगदान होतं. यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्यानं सूर्यकुमार यादवचा झेलही घेतला, जो मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे.
अखेरीस मुंबई इंडियन्सला 16 षटकांत 8 गडी गमावून केवळ 139 धावाच करता आल्या. अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सनं 18 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमधील आपलं स्थान निश्चित केलं.
आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. संघाचे 12 सामन्यांमधून 18 गुण आहेत. या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिलाच संघ आहे. आता त्यांचं लक्ष्य अव्वल 2 मध्ये राहण्याचं असेल, जेणेकरून त्यांना अंतिम सामन्यामध्ये पोहचण्यासाठी एक संधी आणखी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल, जय शहा यांची सुचना ! टॉसची भानगड नको, दोनपैकी ‘या’ संघाने घ्यावा निर्णय
रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो
बुमराहच्या आऊट स्विंग होणाऱ्या चेंडूनं अचानक वाट बदलली! सुनील नारायण चारी मुंड्या चित! पाहा VIDEO