भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या मिताली राज आणि महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे आता पोवार यांच्या प्रशिक्षक करार वाढवण्यात येणार नसल्याचे वृत्त आहे.
त्यांचा तीन महिन्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ शुक्रवारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नवीन अर्ज मागवल्याचेही वृत्त आहे. तसेच पोवार यांनी जरी पून्हा अर्ज केला तरी त्याचा विचार केला जाणार नसल्याचीही चर्चा आहे.
त्यामुळे जर हे वृत्त खरे ठरले तर पोवार यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी पक्की मानली जात आहे.
याबद्दल बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘पोवार यांचा करार आज(30 नोव्हेंबर) संपणार आहे आणि त्यांना पुन्हा हे पद मिळण्याची खूप कमी संधी आहे.
मिताली राज आणि रमेश पोवार हा वाद नुकत्याच विंडिजमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघातून मितालीला वगळण्यात आल्यानंतर सुरु झाला आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना मितालीने बीसीसीआयला पत्र लिहून रमेश पोवार यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.
पण तिच्या या आरोपांना उत्तर देताना हे सर्व आरोप पोवार यांनी नाकारले आहेत. तसेच तिला तिच्या कमी स्ट्राइक रेटमुळे संघात न घेण्याचे कारण पोवार यांनी स्पष्ट केले आहे.
पोवार यांना माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
एशिया कप स्पर्धेनंतर काही भारतीय वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षक बदलण्याची मागणी केल्याने आरोठे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
मात्र तरीही अजूनही मिताली राज आणि भारताची टी20 कर्णधार हरमनप्रीतमधील तणावाबाबत कोणतेही वृत्त नाही.
याबद्दल बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘हरमनप्रीत आणि मिताली या विंडीजमध्ये जे झाले त्यानंतर आता एकमेकींबरोबर कसे वागतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नाहीतर ड्रेसिंग रुममध्ये आणखी समस्या वाढतील.’
या प्रकरणाबाबत मात्र अजूनतरी हरमनप्रीतने कोणतेही भाष्य केलेले नाही. पण मितालीने हरमनप्रीत बरोबरील मतभेद दूर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तीने एकत्र बसून यावर चर्चा करुन हा मतभेद दूर केला पाहिजे, असे म्हटले आहे.
भारतीय महिला संघ जानेवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये भारतीय महिला संघाबरोबर नवीन प्रशिक्षक असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा आर्यलॅंडवर विजय
–विराट कोहलीची खेळातील परिपूर्णता मोनालिसाच्या पेंटीगसारखीच
–पृथ्वीच्या दुखापतीबरोबरच या गोष्टीमुळेही टीम इंडिया टेन्शनमध्ये