सध्या इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर, सर्वात श्रीमंत क्रिकेटर दिसून येतील भारताचे. एकतर आपल्या क्रिकेटर्सची कॉन्ट्रॅक्टच करोडोंची आहेत. आयपीएलमधून आणखी करोड आणि एडवर्टाइजमेंटचा तर विषयच वेगळा. हे सगळं झालं इंटरनॅशनल क्रिकेटर्सच. मात्र, कधी विचार केला आहे का, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रणजी आणि दुसर्या मॅचेस खेळणाऱ्या तरुण क्रिकेटर्सना किती पगार मिळत असेल?, त्यांची पण कॉन्ट्रॅक्ट असतात का? बोनस किती असेल? जर तुम्ही हा विचार केला असेल तर आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या लेखातून देऊ.
एका वाक्यात सांगायचं झालं तर, इंटरनॅशनल क्रिकेटर्सप्रमाणे करोडपती नाही पण, भारतातील डोमेस्टिक क्रिकेटर्स लखपती नक्की होतात. अगदी २० वर्षांपूर्वी डोमेस्टिक क्रिकेटर्सना अगदी तुटपुंज्या पगारात क्रिकेट खेळायला लागायचे. कुठेतरी दहा पंधरा हजार रुपये त्यांना एका मॅचचे मिळायचे. मात्र, २००४ नंतर परिस्थिती बदलली. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयच्या एकूण वार्षिक नफ्यातील २६ टक्के रक्कम खेळाडूंमध्ये वितरित करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यातील १३% इंटरनॅशनल क्रिकेटर्सना, १०.६ टक्के डोमेस्टिक पुरुष क्रिकेटर्सना आणि राहिलेली २.४ टक्के रक्कम ज्युनियर क्रिकेटर्स आणि वुमेन्स क्रिकेटला देण्याच ठरलं. याव्यतिरिक्त स्टेट क्रिकेट असोसिएशनलाही क्रिकेटच्या पगारात वाढ करण्याचे आदेश दिले गेले. यामुळे क्रिकेटर्सचा वर्तमान निश्चित सुधारला.
२०१७ ला बीसीसीआयने आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी क्रिकेटर्सच्या मॅच फीसमध्ये मोठी वाढ केली. रणजी ट्रॉफीचा एक दिवस खेळण्यासाठी त्यांना ३५ हजार मिळू लागले. इतकंच काय स्कॉडमध्ये असलेल्या पण इलेव्हनमध्ये नसलेल्या क्रिकेटर्सनाही निम्मी रक्कम देण्याचा निर्णय झालेला. २००७ ते २०१६ या काळातील सॅलरीपेक्षा ही वाढ तब्बल २५० टक्के होती. खरंतर या निर्णयाचे श्रेय, कोर्टाने नेमलेल्या विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीला जाते.
हेही पाहा- पाकिस्तानी क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमावतात भारतातले रणजी क्रिकेटर्स
इतकी रक्कम मिळत असतानाही, काही सीनियर डोमेस्टिक क्रिकेटर्स यावर नाराज होते. अशात जगभरात कोविडने थैमान घातले आणि इंडियन क्रिकेटचे जवळजवळ दोन सीजन वाया गेले. क्रिकेटर्स आर्थिक संकटात सापडले. २०२२ ला रणजी ट्रॉफी सुरू व्हायच्या आधी बीसीसीआयने सर्वच डोमेस्टिक क्रिकेटर्सना दिवाळी-दसरा सारेकाही एकाच वेळी साजरा करण्याची संधी दिली. न खेळल्या गेलेल्या २०१९-२०२१ सिझनची भरपाई म्हणून ५० टक्के सीजन फी प्रत्येक क्रिकेटरला दिली गेली. त्याचवेळी सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल केला.
नव्या स्ट्रक्चरनुसार, ४० पेक्षा जास्त फर्स्ट क्लास मॅचेस खेळलेल्या क्रिकेटपटूंना प्रतिदिन साठ हजार, २१ ते ४० मॅच खेळलेल्यांना प्रतिदिन पन्नास हजार दिले जाणार. यापेक्षा कमी अनुभव असलेले क्रिकेटरही दररोज ४० हजार रुपये कमवण्यास पात्र ठरतात. हा असा बदल होता ज्याची सारेजण आतुरतेने वाट पाहत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, इंडियन डोमेस्टिक क्रिकेटर्सची ही कमाई पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सपेक्षा जास्त आहे.
भारतात महिलांचे फर्स्ट क्लास क्रिकेट होत नसल्याने लिस्ट ए आणि टी२० मध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला. इथे प्रत्येक मॅचसाठी २० हजार रुपये देण्याची तरतूद केली केली. अंडर २३ आणि अंडर नाईन्टीन क्रिकेटर्सनाही प्रत्येक लिस्ट ए मॅचचे अनुक्रमे २५ हजार आणि २० हजार देत प्रोत्साहन देण्यात आले. इतकेच नव्हे, तर प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी, रिझर्व प्लेअर्सना निम्मी मॅच फी मिळणे नक्की आहे. या साऱ्यांना याआधी प्रत्येक मॅचचे फक्त साडेबारा हजार रुपये मिळायचे.
वरील सर्व सिनियर्सवर पैशाचा वर्षाव झाला असताना, इंडियन क्रिकेटचे मूळ जिथे आहे त्या अंडर १६ क्रिकेटर्सनाही प्रत्येक दिवसाचे ७ हजार देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे तुम्ही बीसीसीआयच्या टप्प्यात आला की, तुमची पैशात खेळायला सुरुवात झालीच समजा. परंतु, या निर्णयांमुळेच भारतीय क्रिकेट जगात भारी आहे, हे आपण विसरता कामा नये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-