पुणे। येथील एमसीए स्टेडिअमवर चालू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे संघातील रणजी सामन्यात रेल्वेच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांवर आज सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्चस्व राखले आहे. महाराष्ट्राने दिवसाखेर ५ बाद २४९ धावा केल्या आहेत.
या सामन्यात रेल्वे संघाचा कर्णधार महेश रावतने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. रेल्वेच्या गोलंदाजाने कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत महाराष्ट्राचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (२५) आणि मुर्तझा ट्रँकवाला(१०) यांना स्वस्तात बाद केले.
त्याचबरोबर राहुल त्रिपाठीही (२९) लवकर बाद झाला. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था ३ बाद ७१ अशी झाली होती. परंतु त्यानंतर आलेला कर्णधार अंकित बावणे आणि नौशाद शेख यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण नौशाद ३९ धावा करून बाद झाला.
त्यानंतर ६ व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रोहित मोटवानीने (५२*) कर्णधाराची चांगली साथ दिली. परंतु अंकितला शतकासाठी अवघ्या ८ धावांची गरज असताना त्याला रेल्वे गोलंदाज करण ठाकूरने शिवकांत शुक्ला तर्फे झेलबाद केले. अंकितने १८४ चेंडूत ९२ धावा केल्या.
रेल्वेकडून करण ठाकूर आणि अमित मिश्राने प्रत्येकी २ बळी घेतले. अनुरीत सिंगने १ बळी घेतला.
दिवसाखेर महाराष्ट्राने आणखी पडझड न होऊ देता २४९ धावा केल्या आहेत. तसेच रोहित मोटवानी ५२ धावांवर तर चिराग खुराणा १ धावांवर नाबाद आहे.