मुंबई आणि विदर्भ यांच्यात रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ विदर्भाचं कडवं आव्हान मोडून 42वं विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल.
अजिंक्य रहाणे सध्या भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. तसेच अलीकडची देशांतर्गत क्रिकेटमधली त्याची कामगिरीही फारशी चांगली राहिलेली नाही. रहाणेनं रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात आतापर्यंत 13.4 च्या सरासरीनं केवळ 134 धावा केल्या आहेत. मात्र एवढं असूनही त्याच्या कर्णधार म्हणून असलेल्या कौशल्याला कमी लेखता येणार नाही.
रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईची ही 48वी फायनल असेल. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर उपलब्ध असेल. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे अय्यरला बीसीसीआयचा वार्षिक करार गमवावा लागला होता. आता अंतिम सामन्यात मोठी खेळी खेळून त्याला त्याचा आत्मविश्वास पुन्हा मिळवायचा आहे.
अंतिम सामन्यात मुंबईला दोन वेळच्या चॅम्पियन विदर्भाकडून कडवं आव्हान मिळू शकतं. विदर्भाच्या संघानं स्पर्धेत वेळोवेळी चांगली कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 150 हून अधिक बळी घेणारा उमेश यादव नव्या चेंडूसह मुंबईच्या फलंदाजांसमोर आव्हान निर्माण करू शकतो.
या मोसमात मुंबईच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आलेली नाही. मात्र त्यांच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेत यष्टिरक्षक फलंदाज हार्दिक तमोरनं 252 धावा, तनुष कोटियननं 481, शम्स मुलानीनं 290 आणि तुषार देशपांडेनं 168 धावांचं योगदान दिलंय. तसेच शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांनीही मुंबईसाठी महत्त्वाची खेळी खेळली आहे. भारतीय अंडर-19 संघाचा फलंदाज मुशीर खान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून अशा परिस्थितीत मुंबईच्या फलंदाजांवर मात करणं विदर्भाच्या गोलंदाजांना सोपं जाणार नाही.
विदर्भाचा विचार केला तर, संघानं खेळाच्या प्रत्येक विभागात सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीत करुण नायर (41.06 च्या सरासरीनं 616 धावा), ध्रुव शौरे (36.6 च्या सरासरीनं 549 धावा), अक्षय वाडकर (37.85 च्या सरासरीनं 530 धावा), अथर्व तायडे (44.08 च्या सरासरीनं 529 धावा) आणि यश राठोड (57 च्या सरासरीनं 456 धावा) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर गोलंदाजीत आदित्य सरवटे (40 बळी) आणि आदित्य ठाकरे (33 बळी) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
मुंबई – अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन ललवाणी, अमोघ भटकळ, श्रेयस अय्यर, मुशीर खान, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), प्रसाद पवार (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलाणी, अथर्व अंकोलेकर, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, धवल कुलकर्णी.
विदर्भ – अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, करुण नायर, यश राठोड, मोहित काळे, हर्ष दुबे, ललित यादव, आदित्य सरवटे (उपकर्णधार), यश ठाकूर, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, ध्रुव वडकर (यष्टीरक्षक), अक्षय वाखारे, अमन मोखंडे, उमेश यादव, दानिश मलेवार, मंदार महाले.
इतर बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल
रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त