भारतात क्रिकेटचे एक वेगळेच असे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्तरावरील आणि प्रादेशिक स्पर्धांपर्यंत क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यातीलच भारतात खेळली जाणारी सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे, ‘रणजी ट्रॉफी’. आजच्या दिवसाचे आणि रणजी ट्रॉफी या स्पर्धेचा एक खास संबंध आहे. तसेच ‘रणजी’ या नावामागची नेमकी खरी गोष्ट काय आहे? हेही जाणून घेऊया
असे पडले रणजी ट्रॉफीचे नाव
रणजी ट्रॉफीचे नाव भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ‘रणजीत सिंग विभाजी जडेजा’ यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. रणजीत सिंग हे नवानगरचे महाराज होते. आणि ते ‘रणजी’ या नावाने प्रसिद्ध होते. रणजीत सिंग इंग्लंड क्रिकेट संघाकडून कसोटी सामना खेळायचे. त्याचबरोबर रणजीत सिंग केंब्रिज विश्वविद्यालयकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचे आणि ससेक्सकडून देखील ते काउंटी क्रिकेटमध्ये खेळायचे. त्यामुळे रणजीत सिंग यांच्या नावावरूनच या स्पर्धेला ‘रणजी’ असे नाव देण्यात आले.
आजच्याच दिवशी ‘रणजी’ यांचा झाला होता जन्म
भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रणजीत सिंग यांचा जन्म १० सप्टेंबर १८७२ साली ‘काठीयावाड’मध्ये झाला होता. रणजी यांना लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये आवड होती. त्यांनी लहानपणीच वयाच्या ११ व्या १८८३ वर्षी साली पहिल्यांदा आपल्या शालेय जीवनात क्रिकेट खेळले होते आणि त्याच्या पुढच्याच वर्षी ते शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधार देखील झाले होते.
रणजी ट्रॉफीचे पहिले आयोजन १९३४-३५ साली झाले होते
सर्वप्रथम १९३४-३५ साली ‘रणजी ट्रॉफी’ ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. याच्या पहिल्या हंगामात पटियालाचे महाराजा भूपिंदरसिंग यांनी या स्पर्धेतील चषक (ट्रॉफी) दान दिले होते. या स्पर्धेतील पहिला सामना मद्रास विरुद्ध मैसूर असा रंगला होता. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळविण्यात आला होता.
तेव्हापासून ही स्पर्धा अविरतपणे चालू होता. मात्र २०२०-२१ साली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी रद्द करण्यात आली. सध्याच्या काळात रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी भारतातील एकूण ३८ संघ सामील होतात.
रणजित सिंग उर्फ रणजी यांची क्रिकेट कारकीर्द
रणजीत सिंग यांनी भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रणजी एक उत्कृष्ट असे फलंदाज होते. त्यांनी १५ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी २ शतक आणि ६ अर्धशतकांचा मदतीने ९८९ धावा केल्या आहेत. तसेच ३०७ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी तब्बल २४,६९२ धावा केल्या होत्या. यामध्ये कसोटी सामन्यातील त्यांची सर्वोच्च खेळी ही १७५ धावांची होती, तर प्रथम श्रेणीमध्ये यांची सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद २८५ अशी होती.
रणजीत सिंग यांना १९०७ मध्ये ‘महाराजा साहब नवानगर’ ही उपाधी मिळाली होती. तसेच रणजीत सिंग हे रणजी राजांच्या गटाचे कुलपती (चांसलर) देखील राहिले होते. त्यांनी लीग ऑफ नेशन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते. २ एप्रिल १९३३ साली वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा –
–जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान, वाचा मनीष पांडेचा क्रिकेट प्रवास