नुकतीच जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामाचा शेवट झाला. या स्पर्धेत गुजरात टायटन्सने विजेतेपदक पटकावले. यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. अशातच आता रणजी ट्रॉफी स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने खेळले जात आहेत. आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर अनेक खेळाडू या स्पर्धेत आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. मात्र, आयपीएलमध्ये सुपरहिट ठरलेले काही खेळाडू रणजी ट्रॉफीत सपशेल फ्लॉप ठरले आहेत.
या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), मयंक अगरवाल (Mayank Agarwal), शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यासोबतच इतर अनेक खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू सोमवारपासून (दि. ०६ जून) सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या (Ranji Trophy Tournament) उपांत्यपूर्व सामन्यात सपशेल फ्लॉप ठरल्याचे दिसले.
मुंबई आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉ फक्त २१ धावाच करू शकला. त्याच्याव्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल फक्त ३५ धावा करू शकला. दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना पृथ्वी शॉ खास काही करू शकला नव्हता. मात्र, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जयस्वाल याने शेवटी काही शानदार खेळी खेळत सर्वांचे लक्ष वेधले होते.
याव्यतिरिक्त कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमधील सामन्याचेही असेच काहीसे आहे. इथे मयंक अगरवाल पहिल्याच डावात १० धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे, कर्नाटकचा कर्णधार मनीष पांडेही ७० चेंडू खेळून फक्त २७ धावा खेळू शकला. पंजाब आणि मध्यप्रदेश संघात सुरू असलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात शुबमन गिल हादेखील फ्लॉप ठरला.
शुबमन गिल याला फक्त ९ धावा करता आल्या. तो आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत होता. यामध्ये तो आपल्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने १६ सामन्यात फलंदाजी करताना ३४.५०च्या सरासरीने ४८३ धावा चोपल्या होत्या. तसेच, पंजाबकडून खेळणारा अभिषेक शर्माला मात्र चांगली सुरुवात मिळाली. त्याने ४७ धावा चोपल्या. अभिषेकने आयपीएल २०२२मध्ये खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघासाठी काही सामन्यात शानदार खेळी केली होती.
विशेष म्हणजे, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील ४ उपांत्यपूर्व सामने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जात आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चार पेग मारल्यानंतर…’, रुटला सार्वकालिन महान खेळाडू म्हणताच नेटकऱ्यांनी ‘दादा’चा घेतला समाचार
हार्दिकवर धोनी आधीपासूनच मेहरबान, पहिल्या तीन सामन्यांमध्येच दिलेली ‘ही’ आनंदाची बातमी
असं काय झालं की, पुनरागमनानंतर हार्दिक पंड्याने पहिल्याच सराव सत्राला मारली दांडी, जाणून घ्या कारण