अफगाणिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज रशीद खानची कामगिरी सध्या अफलातून होत आहे. तो सध्या यशाची नवनवीन शिखरे गाठत असतानाच काल त्याने क्रिकेट जगतात एक इतिहास रचला आहे.
काल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी विश्वचषक २०१९ पात्रता फेरीसाठी रशीद खानचे नाव प्रभारी कर्णधार म्हणून घोषित केले. अफगाणिस्तानचा नियमित कर्णधार असगर स्टेनिकझाईची अपेंडिक्सची सर्जरी झाल्याने तो विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रशीद खानला देण्यात आली आहे.
त्याबरोबरच रशीद खानने सर्वात तरुण कर्णधार बनण्याचा इतिहास रचला आहे. तो जगातील सर्वात कमी वयाचा कर्णधार बनला आहे. रशीद सध्या १९ वर्षाचा आहे. याआधी हा विक्रम बर्मुडाच्या रॉडनी ट्रॉटच्या नावावर होता. त्याला जेव्हा कर्णधार घोषित केले होते तेव्हा तो २० वर्षे आणि ३३२ दिवसांचा होता.
याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की, “डॉक्टरांनी सांगितले आहे की असगर अपेंडिक्सच्या सर्जरीनंतर जवळ जवळ १० दिवसांनी क्रिकेट खेळू शकतो त्यामुळे सध्याचा उपकर्णधार रशीद खान असगरच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करेल.”
रशीद खानने नुकतेच मागील आठवड्यात आयसीसीच्या वनडे आणि टी २० च्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच तो आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
आजपासून विश्वचषक पात्रता स्पर्धेचे सराव सामने सुरु झाले असून मुख्य स्पर्धेला ४ मार्च पासून सुरुवात होणार आहे. आज सराव सामन्यात अफगाणिस्तानने विंडीजचा ३० धावांनी पराभव केला आहे.