इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात रविवारी (8 नोव्हेंबर) दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल.या हंगामातील मागील सामन्यांची कामगिरी पाहता, या सामन्यात हैदराबाद संघ दिल्लीपेक्षा मजबूत आहे अशीच चर्चा रंगली आहे. हैदराबादच्या एका गोलंदाजामुळे दिल्ली संघ चांगलाच त्रस्त आहे.
रशिद खानने दिल्लीविरुद्ध केली उत्कृष्ट गोलंदाजी
सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान हा प्रत्येक संघासाठी मोठा धोकादायक गोलंदाज मानला जातो. त्याने दिल्ली कॅपिटल्सला आपल्या गोलंदाजीने चांगलाच त्रास दिला आहे. या हंगामात दिल्लीने हैदराबादविरुद्धचे दोन्ही सामने गमावले आहेत. या दोन्ही सामन्यात राशिद खान दिल्लीच्या पराभवाचे कारण ठरला होता.
हंगामात दिल्लीच्या 6 फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
अबुधाबीमध्ये दिल्ली कॅपिटलसविरूद्ध खेळलेल्या सामन्यात राशिद खानने 4 षटकांत केवळ 14 धावा देऊन 3 बळी घेतले होते. 162 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला केवळ 147 धावाच करता आल्या. यानंतर, दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 219 धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीला केवळ 131 धावाच करता आल्या. या सामन्यातही रशिद खानने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने 4 षटकांत केवळ 7 धावा देऊन 3 बळी घेतले होते. म्हणजे राशिद खानने या हंगामात दिल्लीविरुद्ध फक्त 21 धावा देऊन 6 बळी घेतले आहेत. क्वालिफायर सामन्यात रशिद कशी कामगिरी करतो हे पाहावं लागेल.
आयपीएल 2020 मधील रशिद खानची कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये राशिद खानने अप्रतिम कामगिरी केली आहे. रशीद खानने 15 सामन्यांत 19 बळी घेतले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 5.30 आहे.