---Advertisement---

MPL 2025: ‘कोकण डर्बी’ रत्नागिरी जेट्सच्या नावे, रायगडचा सलग दुसरा पराभव

On: मंगळवार, जून 10, 2025 1:47 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये 10 जून रोजी तीन सामने खेळले जाणार आहेत. दिवसातील पहिला सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा खेळला गेला. सकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात अनुभवी रत्नागिरी जेट्ससमोर युवा खेळाडूंनी सजलेल्या रायगड रॉयल्सने अक्षरशः गुडघे टेकले. यासह रत्नागिरीने कोकण डर्बी जिंकण्यात यश मिळवले.

रत्नागिरी जेट्स संघाला या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. धीरज फटांगरे व हंगामातील पहिला सामना खेळणारा अथर्व धर्माधिकारी यांनी संघाला 60 धावांची मजबूत सलामी दिली. अथर्व बाद झाल्यानंतर धीरज व कर्णधार अझीम काझी यांनी पुन्हा 46 धावांची भागीदारी केली. यादरम्यान धीरजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 43 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. धीरज बाद झाल्यावर अझीम याने आक्रमक धोरण स्वीकारले. केवळ 29 चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करताना दिव्यांग हिंगणेकर सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. अखेरच्या षटकात रिटायर्ड आउट होण्यापूर्वी त्याने 38 चेंडूमध्ये 72 धावा जोडल्या. अखेर रत्नागिरीने 20 षटकात 188 धावा केल्या.

विजयासाठी मिळालेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना रायगड रॉयल्सला समाधानकारक सुरुवात मिळाली नाही. नवा सलामीवीर ऋग्वेद मोरे हा केवळ तीन धावा करून बाद झाला. त्यानंतर दिग्विजय पाटील, हर्ष मोगावीरा व कर्णधार ऋषभ राठोड हे देखील दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरले.‌ सिद्धेश वीर व नीरज जोशी यांनी चांगली सुरुवात केली मात्र, ते अनुक्रमे 18 व 19 धावाच करू शकले. तळातील कोणताही फलंदाज 20 धावांपर्यंत न पोहोचू शकल्याने संघाला 67 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. रत्नागिरीसाठी अनुभवी सत्यजित बच्छाव याने 17 धावा देत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार अझीम काझी याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---