पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत बाराव्या दिवशी दुसऱ्या लढतीत फिरकीपटू सत्यजीत बच्छाव(५-१७) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा १२ धावांनी पराभव करून पाचव्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामवीर प्रीतम पाटील खाते न उघडताच शून्यावर तंबूत परतला. मनोज इंगळेने प्रीतमला झेल बाद करून रत्नागिरी जेट्सला पहिला धक्का दिला. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरने ३५चेंडूत ४३ धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. यात त्याने ५चौकार व १षटकार मारला. त्याला धीरज फटांगरेने ३६चेंडूत १चौकर व १षटकाराच्या मदतीने ३६धावांची खेळी करून साथ दिली. धीरज व दिव्यांग या जोडीने एकेरी व दुहेरी धावा काढण्यावर जास्त भर दिला. या जोडीने दुसऱ्या ६४चेंडूत ७४धावांची भागीदारी केली. धीरज फटांगरे व दिव्यांग हिंगणेकरला विकी ओस्तवालने बाद केले. त्यानंतर अझीम काझी २५, किरण चोरमले २१ यांनी धावा काढून संघाचा धावफलक हलता ठेवला. रायगडच्या मनोज इंगळे(३-१९), तनय संघवी(३-२४), विकी ओस्तवाल(२-१८)यांच्या अचूक गोलंदाजीपुढे रत्नागिरी जेट्सचे मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. रत्नागिरी जेट्सला निर्धारित षटकात ९ बाद १३८धावाच करता आल्या.
रायगड रॉयल्स संघाला विजयासाठी १३८धावांचे आव्हान होते. धावांचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघ १९.३ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे रायगडला १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रत्नागिरीच्या सत्यजीत बच्छाव(५-१७) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे रायगड रॉयल्सचा डाव गडगडला. विशांत मोरे(१), नौशाद शेख(४), मेहुल पटेल(४), ऋषभ राठोड(०), रोहन मारवाह(७) हे आघाडीचे फलंदाज आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात स्वस्तात बाद झाले. सिद्धेश वीरने एकाबाजूने लढताना २७चेंडूत ३६धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रायगड रॉयल्स ७बाद ६८धावा असा अडचणीत होता. त्यावेळी त्यांना विजयासाठी ४२चेंडूत ७१धावांची आवश्यकता होती. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विकी ओस्तवालने संयमी खेळी करत ३५चेंडूत ४चौकार व २षटकाराच्या मदतीने ५०धावांची केलेली खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. विकीने तनय संघवी(१९धावा)च्या समवेत आठव्या विकेटसाठी ३३चेंडूत ५१धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. १२चेंडूत १९धावांची आवश्यकता असताना १९व्या षटकात सत्यजीत बच्छावने आपल्या वैयक्तिक अखेरच्या षटकात ४धावा देत २विकेट देऊन सामन्याला कलाटणी दिली.
संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: २०षटकात ९बाद १३८धावा (दिव्यांग हिंगणेकर ४३(३५,५x४,१x६), धीरज फटांगरे ३४(३६,१x४,१x६), अझीम काझी २५, किरण चोरमले २१, मनोज इंगळे ३-१९, तनय संघवी ३-२४, विकी ओस्तवाल २-१८) वि.वि.रायगड रॉयल्स: १९.३षटकात सर्वबाद १२६धावा(विकी ओस्तवाल ५०(३५,४x४,२x६), सिद्धेश वीर ३६(२७,५x४), तनय संघवी १९, सत्यजीत बच्छाव ५-१७, योगेश चव्हाण २-१४, विजय पावले १-१७, प्रदीप दाढे १-३२); सामनावीर – सत्यजीत बच्छाव.