भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पुन्हा एकदा समालोचक आणि समीक्षक या आपल्या जुन्या रूपात परतले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. हार्दिक पांड्याच्या निवृत्तीबद्दलही ते बोलले. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत त्यांनी एक सल्ला दिला आहे.
मागील काही वर्षांपासून कसोटी क्रिकेट संपुष्टात येत असून त्याचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी चर्चा आहे. कसोटी क्रिकेटला चाहत्यांच्या जवळ नेण्यासाठी आयसीसीने कसोटीमध्ये डे-नाईट स्वरूप लागू केले आहे. आता जवळपास प्रत्येक मालिकेत दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जातो. यासोबतच आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचीही सुरुवात केलीये. ही पहिली चॅम्पियनशिप पार देखील पडलीये.
याच मुद्द्यावर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “तुम्ही १०-१२ संघांसोबत कसोटी क्रिकेट खेळू शकत नाही. तुमच्याकडे अव्वल सहाच संघ असणे आवश्यक आहे. तुम्ही गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे. संघांच्या संख्येवर नाही. क्रिकेटचा जगभरात प्रसार करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. क्रिकेटला पुढे न्यायचे असेल तर, वनडे आणि टी२० मध्ये संघ वाढवले पाहिजेत आणि कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांची संख्या कमी करावी लागेल.”
क्रिकेट फक्त अव्वल सहा संघांनी खेळावे असे त्यांनी म्हटले. ते सहा संघ देखील पात्रता फेरीतूनच यायला हवेत. ते म्हणाले, “भारत असो, ऑस्ट्रेलिया असो की इंग्लंड, जर तुम्हाला कसोटी सामना खेळायचा असेल तर, तुम्हाला पात्रता फेरीतूनच पुढे यावे लागेल. तुम्ही कोणत्या संघाविरुद्ध खेळत आहे हे महत्त्वाचे नव्हे तर, तुम्ही पात्र होत आहे का? हा निकष असायला हवा.”
आयसीसीने २०१९ पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. यामध्ये, कसोटी क्रमवारीतील अव्वल ९ संघ खेळतात. दोन वर्षांच्या कालावधीनंतर गुणतालिकेत अव्वल असणारे दोन संघ अंतिम सामना खेळतात. या चॅम्पियनशिपच्या पहिल्या आवृत्तीत भारत आणि न्यूझीलंड यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यात न्यूझीलंडने प्रथम विजेते होण्याचा मान मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर
जडेजा म्हणतोय ‘धवनला भारतीय संघात घेऊच नका’, धिम्या खेळीवरून साधला थेट निशाणा
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा