इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ४ वेळा विजेतेपद पटकवलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या १५व्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर्षी संघाच्या नेतृत्वाची कमान रविंद्र जडेजा याच्या हातात आहे. शनिवारी (दि. ०९ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये आयपीएलचा १६वा सामना खेळला जाणार आहे. कर्णधार म्हणून जडेजाने काहीच खास कामगिरी आत्तापर्यंत केलेली नाही. आता त्याच्या कर्णधारपदाबाबत हरभजन सिंगनंतर रवी शास्त्री यांनीही आपले मत मांडले आहे.
रवी शास्त्री (Ravi shastri) माध्यमांशी बोलताना म्हणाले रविंद्र जडेजाला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल आणि सीएसकेच्या खेळाडूंवर सकारात्मक प्रभाव टाकावा लागेल. ते म्हणाले, ‘यामुळे खूप फरक पडतो की, तुम्ही आयपीएलमध्ये सर्वश्रेष्ठ कर्णधाराची जागा घेत असता आणि तुमच्याकडून धोनीसारख्या नेतृत्वाची अपेक्षा आहे. परंतु, धोनीचे स्थान घेणे एवढी सहज आणि सोपी गोष्ट नाही. जडेजाने कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे, तो यापासून मागे हटत असल्याचे दिसत आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘मला वाटते की, त्याने जास्तीत जास्त खेळाडूंसोबत संवाद साधावा आणि मैदानात जे सुरू आहे, त्याच्याशी पूर्णपणे जोडले जावे. नव्या कर्णधारला आपल्या कारकीर्दीची सुरुवात अशा पद्धतीने करायला हवी, कारण एकदा की कर्णधार म्हणून बाॅडी लॅंग्वेज दाखवली की संघातील बाकी खेळाडूंवर त्याचा परिणाम होतो.’
गतविजेत्या सीएसकेची आयपीएल २०२२ मध्ये सुरुवात चांगली झाली नसून संघ गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आहे. या हंगामात वेगवान गोलंदाज दीपक चाहरची कमी संघाला भासत आहे कारण त्याने मागील हंगामात १५ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या होत्या.
सीएसकेला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ६ विकेट्सने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने आणि तिसऱ्या सामन्यात लखनऊने पराभूत केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणारा साई सुदर्शन, ज्याचे आर अश्विननेही केले होते तोंडभरून कौतुक
‘कौतुक करावे तेवढे कमीच’, हार्दिक पंड्या ‘मॅचविनर’ राहुल तेवतियावर भलताच खुश