मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र, यादरम्यान संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. त्यांच्या कार्यकाळात भारताने २०१९ आयसीसी विश्वचषकही गमावला. त्या विश्वचषकात अंबाती रायुडूला संधी दिली गेली नव्हती. अंबाती रायुडूला संधी दिली गेली नसल्यामुळे त्यावेळी संघाचे निवडकर्ते आणि व्यवस्थापनावर चांगलेच प्रश्न उपस्थित झाले होते. अशात आता याआधी भारतीय संघाचे व्यवस्थापक राहिलेले सुनील सुब्रमण्यम यांनी रायडूला संघात संधी न मिळण्याविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
शास्त्रीं २०१४ मध्ये सुरुवातील भारतीय संघासोबत संचालकाच्या रूपात जोडले गेले होते. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये एक वर्षाची विश्रांती घेतली आणि २०१७ मध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जवळपास सहा-सात वर्ष प्रशिक्षकाची जबाबादारी पार पाडली. दरम्यान भारताला शास्त्रींच्या कार्यकाळात २०१६ टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक, २०२१ जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि आता पुन्हा टी२० विश्वचषक या स्पर्धांमध्ये अपयश मिळाले आहे.
यापूर्वी भारतीय संघाचे व्यवस्थापक राहिलेले सुनील सुब्रमण्यम यांनी अंबाती रायुडूला संघात न घेतल्यानंतर काय झाले होते याचा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रवी शास्त्रींच्या मते त्यावेळी अंबाती रायुडू संघात असता तर फरक पडला असता. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना संगितले आहे की, “हे खूप अवघड होते. मला वाटते की, रायुडूच्या असण्याने फरक पडला असता. हे त्या गोष्टींपैकी एक आहे, ज्या होऊ शकल्या असत्या. होय, केवळ एका गोष्टीचे मला वाईट वाटते आणि मला निराश करते की, आम्ही आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकू शकलो नाही.”
दरम्यान, अंबाती रायुडू त्यावेळी संघात नसल्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले होते आणि संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला होता. रायुडू या विश्वचषकापूर्वी चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत होता. मात्र, विश्वचषकात त्याला निवडले गेले नव्हते. त्यानंतर केएल राहुल, विजय शंकर आणि रिषभ पंतने त्याची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण ते यामध्ये अपयशी ठरले होते.
उपांत्य सामन्यात भाताचा पराभव झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले होते की, संघाला मधल्या फळीत एका मजबूत फलंदाजाची गरज होती. या स्थानाने नेहमी हैराण केले आहे. मात्र, याचा पर्याय निघू शकला नाही. त्यांचे म्हणेणे होते की, जर उपांत्य सामन्याआधी भारताने एक सामना अजून खेळला असता, तर मयंक अगरवालला संधी देता आली असती. अशाप्रकारे मयंकला सलामीला आणि केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर उतरवता आले असते.