सध्या चेतेश्वर पुजाराचं नाव खूप चर्चेत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी नेहमीच उत्कृष्ट राहिली आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंवर नजर टाकल्यास, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात पुजारा हा आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वी पुजारानं टीम इंडियात परतावं, अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू होती. आता पुजारा संघात परतला नसला, तरी त्याला भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची साथ मिळाली आहे. पुजाराची जागा घेणं जवळपास अशक्य असल्याचं मत या दिग्गज भारतीय खेळाडूचं आहे.
एका मीडिया चॅनलवरील चर्चेदरम्यान रवी शास्त्रींना विचारण्यात आलं की, आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजारासारखी भूमिका कोण साकारू शकतं? यावर पुजाराची जागा घेणं खूप अवघड असून त्याची तुलना कोणाशीही होऊ नये, असं रवी शास्त्री म्हणाले.
शास्त्री चेतेश्वर पुजाराच्या समर्थनार्थ उतरताना म्हणाले, “पुजारा हा वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे. त्याची कोणाशीही तुलना करू नये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुजाराकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या. तो उभा राहिला की आपण मालिका जिंकायचो. त्यामुळे त्याची तुलना कोणाशी करू नका. मला खूप आनंद झाला की मी त्याला ऑस्ट्रेलियात पुन्हा भेटू शकेन. रवी शास्त्री यांनी पुजारा ऑस्ट्रेलियात येण्याचा उल्लेख केला, जो या कसोटी मालिकेत हिंदी कॉमेंट्री करताना दिसेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात चेतेश्वर पुजारानं 24 सामन्यांच्या 43 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या 43 डावांमध्यं त्यानं 5 शतकं आणि 11 अर्धशतकांसह एकूण 2,033 धावा केल्या आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पुजाराची सरासरी 50.82 इतकी आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत, पुजारानंतर विराट कोहली येतो. विराटनं आतापर्यंत 42 डावांत 1,979 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
हार्दिक पांड्या आता कसोटी क्रिकेट का खेळत नाही? शेवटचा कसोटी सामना कधी खेळला होता?
वीरेंद्र सेहवागच्या मुलाची झंझावाती खेळी! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकलं द्विशतक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहायचा? भारतीय वेळेनुसार टॉस किती वाजता होईल?