भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून आपल्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा भारतीय संघासह हा शेवटचा दौरा असून, यानंतर त्यांचा भारतीय संघासोबतचा करार संपुष्टात येईल. म्हणूनच त्यांचा प्रशिक्षक पदावरून निवृत्त होण्यापूर्वी संघाला विश्वचषक जिंकवून देण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, या सामन्यात भारतीय संघाने फिरकीपटू खेळवावा की वेगवान गोलंदाज? या सर्व गोष्टींवर रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
शास्त्रींनी सांगितले की सामन्यात फिरकीपटू खेळवावे की वेगवान गोलंदाज
एका वाहिनीशी बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, “मैदानावर किती दव आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यानुसार गोलंदाजी किंवा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. यामुळे आम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज आणण्यासाठी मदत होईल.”
ते पुढे म्हणाले की, “सराव सामन्यांमधून आम्ही खेळाडूंची लय शोधण्याचा प्रयत्न करू. सर्व खेळाडूंनी आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला आहे. यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज नाही.”
हा घटक संध्याकाळच्या सामन्यात महत्वपूर्ण ठरेल
विश्वचषकातील सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहेत. रात्री होणाऱ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरते. संध्याकाळी मैदानावर खूप जास्त दव असते. जास्त दव असल्यामुळे फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत होत नाही. दवामूळे फिरकीपटूंना खेळपट्टीकडून चांगली मदत मिळत नाही. त्यांना चेंडूवर योग्य पकड ठेवणे अवघड होऊन बसते.
सराव सामन्यात भारत वरचढ
तत्पूर्वी, भारताने आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८८ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून ६ चेंडू शिल्लक असताना भारतीय संघाने १९२ धावा केल्या आणि सामना जिंकला. ईशान किशन आणि केएल राहुल यांनी भारतासाठी अर्धशतके ठोकली, ज्यामुळे भारताला सहज विजयाची नोंद करण्यात मदत झाली. रिषभ पंतने षटकार ठोकून भारतीय संघाला विजयी केले.






