ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारा ज्याप्रकारे बाद झाला त्यामुळे तो खूप निराश झाला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीनचा चेंडू सोडण्याच्या प्रयत्नामध्ये पुजारा बोल्ड झाला. चेंडू त्याच्या रेषेवर पडून यष्टिरक्षकाकडे जाईल अशी पुजाराची अपेक्षा होती. मात्र, त्याने चेंडूची ओळ कव्हर केली नाही आणि हीच चूक त्याला महागात पडली. चेंडू आदळल्यानंतर तो आत मध्ये आला आणि ऑफ-स्टंपवर आदळला. बाद झाल्यानंतर पुजाराच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून येत होती.
दरम्यान, सामन्यावेळी शुबमन गिलही (Shubman Gill) चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याचाही चेंडू ऑफ स्टंपला लागला. मात्र, पुजारासारख्या (Cheteshwar Pujara) अनुभवी फलंदाजाने या चेंडूचा अधिक चांगल्या पद्धतीने सामना करायला हवा होता, असे मत समालोचन करताना रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. यावेळी शास्त्री म्हणतात की, “पुजाराने चेंडूची रेषा कव्हर करायला हवी होती.” पुढे शास्त्री म्हणाले की, “शुबमन गिल शिकेल पण चेतेश्वर पुजाराने अशाप्रकारे बाद झाल्याने निराश व्हायला हवे. त्याचा पुढचा पाय किमान एक फूट पुढे आणि नंतर पलीकडे असायला हवा होता.”
भारतीय संघ आला अडचणीत
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर भारतीय टॉप ऑर्डर टिकू शकली नाही. आघाडीच्या 4 फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाने 20 धावांचा आकडा गाठला नाही. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 48 धावा करून डावाला थोडीफार साथ दिली पण दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी ऑफस्पिनर नॅथन लायनने त्याला बाद केले.
चेतेश्वर पुजाराने कौंटी क्रिकेटमध्ये ससेक्ससाठी खूप धावा केल्या. त्याची फलंदाजीची सरासरी 91 होती. तर, याच जोरावर त्याचे भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमन झाले. पुनरागमनानंतर पुजारा फार काही करू शकलेला नाही. पहिल्या दोन विकेट्स गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता, अशात पुजारासारख्या अनुभवी फलंदाजाने विकेटवर खेळणे अपेक्षित होते. मात्र भारतीय फलंदाजी क्रमाची भिंत म्हणवल्या जाणाऱ्या पुजाराला फार मोठी खेळी खेळता आली नाही. त्याच्या बाद झाल्यानंतर भारतीय संघाची स्थिती कमकुवत झाली.
आता रहाणे-भरतला तिसऱ्या दिवशी आपली ताकद दाखवावी लागणार
शुक्रवार (9 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामधील तिसऱ्या दिवशी, भारतीय संघ पहिल्या डावात 5 विकेट गमावत 151 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात करेल. विजय मिळविण्यासाठी भारतीय संघाला आणखी 318 धावांची गरज आहे. अजिंक्य रहाणे (29) आणि केएस भरत (5) तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून सुरुवात करतील. आता भारतीय संघाला या सामन्यात पकड राखायची असेल तर रहाणे आणि भरत यांना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठी खेळी खेळावी लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video