भारतीय संघाने १९८३ चा विश्वचषक जिंकला आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताच्या दबदब्याला सुरुवात झाली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर, १९८५ मध्ये ‘ वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. १९८३ विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघासमोर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचे मोठे आव्हान होते. यासोबतच ‘ ऑडी १०० ‘ ही कार या स्पर्धेचे खास आकर्षण होते, कारण मालिकावीराला ही कार मिळणार होती. या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात धूळ चारत जेतेपद पटकावले होते. तसेच रवी शास्त्री हे या महागड्या गाडीचे मानकरी ठरले होते. रवी शास्त्री यांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात रवी शास्त्री यांनी मोलाची भुमिका बजावली होती. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना मालिकावीर पुरस्कार देण्यात आला होता. तसेच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूला ऑडी १०० देण्यात येणार होती. या कारसाठी, रवी शास्त्री आणि जावेद मियाँदाद यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली होती. अखेर रवी शास्त्री यांनी बाजी मारत ऑडी १०० आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट चषक भारतात आणले होते.
त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जावेद मियाँदाद देखील असता. त्याच्याकडे ऑडी कार जिंकण्याची कुठलीही संधी नव्हती. परंतु, त्याने अनेकदा माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत होतो, तेव्हा आमच्यात सतत चर्चा सुरू होती. तो एक चांगला खेळाडू होता. परंतु, माझे लक्ष विचलित करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत होता. त्याने अनेक प्रयत्न केले तरी ही मला माहीत होते की, तो ही गाडी मिळवू शकणार नाही.”
ही कार माझीच आहे
त्यांनी पुढे म्हटले की,” मी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ही कार माझी आहे. भारतीय संघात याबाबत चर्चा देखील झाली होती की, जर संघातील खेळाडूला कार मिळाली तर त्या कारचे काय होणार. यावर कपिल देव म्हणाले होते की, २५ टक्के रक्कम तू ठेव. परंतु, मोहिंदर अमरनाथ यांनी म्हटले होते की, ज्या कोणाला ही कार मिळेल, तो या कारचा मानकरी असेल.”
रवी शास्त्री यांची धामकेदार कामगिरी
या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात रवी शास्त्रींना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात व उपांत्य तसेच, अंतिम सामन्यात त्यांनी अर्धशतके झळकावली. संपूर्ण स्पर्धेत सलामीवीर म्हणून खेळताना त्यांनी १८२ धावा व ८ बळी आपल्या नावे करत मालिकावीर म्हणून दिला जाणारा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा पुरस्कार आपल्या नावे केला होता.
हेही वाचा
सोलापूरच्या किरण नवगिरेचा झंझावात! मारली वुमेन्स टी२० चॅलेंजमधील सर्वात वेगवान फिफ्टी
“हर्षल पटेलला बोनस द्या”; माजी क्रिकेटरची आरसीबी मॅनेजमेंटकडे मागणी