टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा लाजिरवाण्या पराभवासाठी स्वत:ला दोषी मानलं आहे. तसं पाहिलं तर बहुतेक खेळाडू पराभवाची जबाबदारी घेत नाहीत, परंतु आर अश्विन हा त्यापैकी एक आहे, जो मानतो की टीम इंडियाच्या पराभवामागे तो एक प्रमुख कारण होता.
भारतीय संघाला पहिल्यांदाच घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. याशिवाय टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये आर अश्विनला बॉल आणि बॅटद्वारे चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो.
रविचंद्रन अश्विननं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल बोलताना सांगितलं की, “माझ्या कारकिर्दीत आणि क्रिकेटमधील माझ्या अनुभवात, आम्हाला फारसा धक्कादायक अनुभव आलेला नाही. मला वाईट वाटतंय. मी यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला माहित नाही. पराभवामागे मी देखील एक मोठं कारण आहे. मी खालच्या फळीत बॅटनं योगदान देऊ शकलो नाही. आम्ही चुकीच्या वेळी विकेट गमावल्या.”
या मालिकेत अश्विनही विकेटसाठी झगडताना दिसला. त्याला 3 सामन्यांच्या 6 डावात केवळ 9 विकेट घेता आल्या. तो घरच्या मैदानावर प्रत्येक सामन्यात जवळपास 9-10 विकेट्स सहज घेतो. आर अश्विननं 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 6 डावात फलंदाज म्हणून 51 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने एका डावात त्याला खातंही उघडता आलं नाही.
अश्विनला पहिल्या सामन्यात फक्त एकच विकेट मिळाली होती. तर दुसऱ्या सामन्यात त्याला दोन्ही डावात 5 विकेट घेता आल्या. त्याच वेळी, मुंबईच्या फिरकीला अनुकुल खेळपट्टीवर तो केवळ 3 विकेट घेऊ शकला. पहिल्या डावात तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशाप्रकारे, आर अश्विनसाठी बॅट आणि बॉलनं ही मालिका खूपच वाईट होती.
हेही वाचा –
पाकिस्ताननं इतिहास रचला! तब्बल इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू गुजरातमध्ये जाणार! मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीनं दिले संकेत
AUS vs PAK: पाकिस्तानी वेगवान आक्रमणासमोर ऑस्ट्रेलिया पुन्हा ढेर, 22 वर्षांनी मालिका जिंकली..!