आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सोमवारी अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजाराने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता या क्रमावारीमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने अॅडलेड कसोटीमध्ये पहिल्या डावात 123 आणि दुसऱ्या डावात 71 धावांची खेळी केली होती.
तसेच या कसोटीत प्रत्येकी 6 विकेट्स घेणाऱ्या आर अश्विन आणि बुमराहने गोलंदाजी क्रमवारीत प्रगती केली आहे. अश्विन 7 व्या स्थानावरुन पॅट कमिन्सला मागे टाकत 6 व्या क्रमांकावर आला आहे. तर बुमराहची क्रमवारी 5 स्थानांनी वधारली असून 33 वे स्थान त्याने पटकावले आहे.
फलंदाजी क्रमवारीत पुजाराप्रमाणेच अजिंक्य रहाणेने 2 स्थानांची प्रगती करताना 17 व्या स्थानावर मजल मारली आहे. त्याने अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात 70 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर रिषभ पंतने सात स्थानांची झेप घेत 59 वे स्थान मिळवले आहे.
मात्र भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि मुरली विजय यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. राहुलची दोन तर विजयची तीन स्थानांनी घसरण होऊन हे दोघे अनुक्रमे 26 आणि 45 व्या क्रमांकावर आले आहेत. तसेच रोहित शर्माचीही 4 स्थानांची घसरण झाली असून तो आता 53 स्थानावर आला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे.
आॅस्ट्रेलिया संघातील उस्मान ख्वाजाची तीन स्थानांनी घसरण होऊन तो 13 व्या स्थानावर आला आहे. अॅरॉन फिंचचीही 89 व्या स्थानावर घसरण झाली आहे. पण शॉन मार्शने 6 आणि ट्रेविस हेडने 17 स्थानांची प्रगती करताना क्रमवारीत प्रगती करताना अनुक्रमे 38 वे आणि 80 वे स्थान मिळवले आहे.
अॅडलेड कसोटीत दुसऱ्या डावात मार्शने तर पहिल्या डावात हेडने अर्धशतकी खेळी केली होती. तसेच आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचीही क्रमावीर 4 स्थानांनी वधारली असून तो आता 55 व्या स्थानावर आला आहे.
त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकाविजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने 913 गुणांसह विराटनंतर दुसरे स्थान मिळवले आहे. तो 900 पेक्षा जास्त गुण मिळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा 5 व्या स्थानावर कायम असून पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अब्बास तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानी घसरला आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कागिसो रबाडा अव्वल स्थानी कायम आहे.
तसेच मिशेल स्टार्कने अॅडलेड कसोटीत 5 विकेट्स घेतल्याने 2 स्थानांची प्रगती केली असून 16 वे स्थान मिळवले आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत नॅथन लायनने 7 स्थानांची झेप घेत 19 वे स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा दुसऱ्या आणि आर अश्विन सहाव्या स्थानावर कायम आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
–केएल राहुलने कडाडून टीका करणाऱ्या गावसकरांच्याच विक्रमाला दिला धक्का
–कसोटीमध्ये २०१८ वर्षातील षटकार किंग होण्याची रिषभ पंतला संधी
–अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम