इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २० व्या सामन्यात रविवारी (२५ एप्रिल) रात्री उशीरा दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एमएस चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या रोमांकचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर काहीवेळातच दिल्लीला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने तो या आयपीएल हंगामातून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.
अश्विनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ही विश्रांती घेण्यामागे सध्या भारतात हाहाकार उडवलेल्या कोविड-१९ महामारीचे कारण त्याने दिले आहे. त्याने या काळात कुटुंबाला साथ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व गोष्टी सुरळीत झाल्या तर त्याने परत येऊन खेळण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
अश्विनने ट्विट केले आहे की ‘यावर्षीच्या आयपीएलमधून उद्यापासून (२६ एप्रिल) मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझे कुटुंब आणि विस्तारित कुटुंब कोविड-१९ विरुद्ध लढा देत आहे. आणि मला या कठीण काळात त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर मी खेळायला परत येण्याची अपेक्षा करतो. धन्यवाद.’
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals 🙏🙏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 25, 2021
अश्विनने यापूर्वीच लोकांसाठी मदतीचा हात केला होता पुढे
सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशातच आश्विन कोविड-१९ मुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व्यथित झाला होता. त्याने देशातील लोकासाठी मदतीने आश्वासनही दिले होते. त्याने ट्विट करत म्हटले होते, ‘माझ्या देशांमध्ये जे काही चालले आहे ते पाहणे हृदयद्रावक आहे. मी आरोग्य विभागाशी निगडित नाही मात्र त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करू इच्छितो की, सतर्क राहा आणि सुरक्षित रहा.’
तसेच त्याने पुढे आणखी एक ट्विट केले होते. त्याने म्हटले होते, ‘मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की हा विषाणू कोणालाही सोडत नाही. मी या लढाईत तुमच्या सोबत आहे. कोणाला काही मदत हवी असल्यास मला सांगा. माझ्या परीने होईल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न करेल.’
अश्विनने आपल्या ट्विटर हँडलचे युजर नेम बदलून ‘स्टे होम स्टे सेफ! टेक युअर वॅक्सिन’ असे केले आहे.
I know there will be people who will retort with a tweet about my position of privilege. I would like to reiterate that this is a virus that spares no one and I am in this fight with all of you. Let me know if I can help and i promise to help anyone that is within my capacity🙏🙏
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 23, 2021
अश्विनची आयपीएलमधील कामगिरी
अश्विनसाठी आयपीएल २०२१ चा हंगाम फारसा खास ठरलेला नाही. त्याला ५ सामन्यांत केवळ १ विकेट घेण्यात यश आले आहे. तसेच त्याने आयपीएल कारकिर्दीत एकूण १५९ सामने खेळले असून २७.६८ च्या सरासरीने १३९ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ४१९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी
SRH vs DC : केन विलियम्सनचे अर्धशतक व्यर्थ; दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर रोमांचक विजय
विराटसाठी दुष्काळात तेरावा महिना! पराभवानंतर झाली ‘ही’ कारवाई