इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अष्टपैलू कामगिरी करत पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले. चेन्नईच्या या ३४ वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या घरच्या मैदानावर इतिहास रचत, गोलंदाजीत पाच बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात शतकही झळकावले. बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावरून शानदार पुनरागमन केले होते. त्याने येथे गोलंदाजी तसेच फलंदाजीमध्येही आपला ठसा उमटविला होता. मात्र, अश्विन कशाप्रकारे आपल्या चुका सुधारतो?, याविषयीचा उलगडा नुकताच झाला आहे.
‘बुद्धिमान क्रिकेटपटू’ म्हणून ओळखला जातो अश्विन
अश्विन हा भारतीय क्रिकेट संघातील एक बुद्धिमान आणि अभ्यासू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला अश्विन विश्लेषण करण्यात तज्ज्ञ आहे. तो सतत आपल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतो. आपला खेळ सुधारण्यासाठी तो सतत नवनवीन गोष्टींचा प्रयोग करताना दिसून येतो. त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, तो प्रत्येक सामन्याची आकडेवारी डायरीत लिहितो. अश्विनचे बालपणीचे प्रशिक्षक सुनील सुब्रमण्यम त्याच्याबद्दल सांगतात की, “या फिरकी गोलंदाजाला सर्वकाही माहित आहे. फलंदाजाला किती दुर आणि किती उंची देऊन चेंडू टाकावा. तसेच, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे क्षेत्ररक्षण लावावे, हे त्याला माहीत असते.”
चेन्नई कसोटीतील दमदार कामगिरीचे मिळाले बक्षीस
चेन्नई कसोटीत केलेल्या दमदार अष्टपैलू कामगिरीचे बक्षीस अश्विनला मिळाले आहे. गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत तो सातव्या तर अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे. अश्विनने चेन्नई येथील दुसऱ्या कसोटीत ८ बळी मिळवले होते. तसेच, खराब होत चाललेल्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात येऊन १०६ धावांची अप्रतिम खेळी साकारली होती.
अशी राहिली आहे आंतरराष्ट्रीय कारकीर्द
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीचा श्रीगणेशा २०११ साली केला. अश्विनने आतापर्यंत भारतीय संघासाठी ७६ कसोटी सामने खेळताना ३९४ बळी मिळविले असून, त्याच्या नावे पाच शतके देखील जमा आहेत. २०१६ मध्ये आयसीसीचा ‘क्रिकेट ऑफ द ईयर’ पुरस्कार त्याने आपल्या नावे केला होता.
महत्वाच्या बातम्या-
बुमराह आणि शमीला टी२० संघातून डच्चू देण्यामागचे कारण काय? घ्या जाणून