बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून डच्चू मिळू शकतो. याला कारण असं की, गेल्या काही काळापासून टीम मॅनेजमेंट त्याच्या कामगिरीवर खूश नसल्याचं बोललं जात आहे. मॅनेजमेंट 2027 एकदिवसीय विश्वचषकासाठी एक मजबूत संघ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. जडेजा या प्रोफाइलमध्ये बसेल की नाही याची खात्री मॅनेजमेंटला नाही. 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा करणारा जडेजा आता फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळतो. त्यानं अखेरचा एकदिवसीय सामना 2023 च्या विश्वचषकात खेळला होता.
जडेजा आता खालच्या फळीत अष्टपैलू खेळाडू म्हणून फिट बसत नाही. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना खूप संघर्ष करतोय. अलिकडच्या काळात त्याच्या स्ट्राइक रोटेशन आणि दबाव सहन करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याच्या जागी खेळू शकणारा अक्षर पटेल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतोय.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची कोचिंग कारकीर्द श्रीलंका दौऱ्यापासून सुरू झाली. टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंना लगेचच संघात समाविष्ट करण्यात आलं. परंतु जडेजा तिथे नव्हता. त्याच्या जागी मॅनेजमेंटनं रियान पराग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर सारख्या इतर फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं की, “गंभीर फॉरमॅटनुसार कोअर टीम तयार करण्याबाबत खूप आग्रही आहे. आतापर्यंत त्यानं कसोटी फॉरमॅटमध्ये जास्त बदल केलेला नाही, परंतु एकदिवसीय विश्वचषकासाठी एक मजबूत पाया तयार केला आहे. “त्याच्याकडे एक स्पष्ट दृष्टीकोन आहे ज्यावर आपण भर देऊ शकतो. तो आणखी काही खेळाडूंना संधी देण्यास उत्सुक आहे.”
हेही वाचा –
फिरकीपटू चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणार! रवींद्र जडेजा, अक्षर पटेल की कुलदीप यादव, कोणाला संधी मिळणार?
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारतीय कर्णधारानं घेतलं साईबाबांचं दर्शन
कांगारुंना मोठा धक्का! आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कर्णधाराचा सहभाग अनिश्चित, भारताला दिलासा!!