भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने काल त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या नवीन घराचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने त्याच्या घराचे नाव ‘क्रिकेट बंगलो’ असल्याचे त्याने म्हटले आहे.
जडेजाने पोस्ट केलेल्या फोटोत तो एका मोठ्या गेटजवळ उभा असल्याचे दिसते. यात त्याने म्हटले आहे की ” ‘क्रिकेट बंगलो’ तयार होत आहे. ” जडेजाने याआधीही राजकोटमध्ये त्याचे स्वतःचे रेस्टोरंट चालू केले आहे.
https://www.instagram.com/p/Bc1obYmFh4-/
जडेजा हा भारताच्या कसोटी संघातील महत्वाचा खेळाडू आहे, पण त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र आपली जागा पक्की करता आलेली नाही.
जडेजा आणि आर अश्विन यांना श्रीलंकाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी युजवेन्द्र चहल, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा संघात समावेश केला आहे.
असे असले तरी जडेजा आणि अश्विन हे दोघेही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या कसोटी संघात मात्र कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जडेजाने १२ बळी घेतले होते तसेच त्याने या वर्षात कसोटीत ५० बळी घेण्याचीही कामगिरी केली आहे.
जडेजाने नुकत्याच सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या इंटर डिस्ट्रिक्ट टी२० स्पर्धेत जामनगर जिल्ह्याकडून खेळताना अमरेली जिल्ह्याविरुद्ध एका षटकात ६ षटकार मारण्याचा विक्रम केला होता.
या सामन्यात जडेजाने ६९ चेंडूत १५४ धावा करताना १५ चौकार आणि १० षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर जामनगरने ६ बाद २३९ धावा केल्या होत्या.
या आधी युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात तर सर गारफिल्ड सोबर्स आणि रवी शास्त्री यांनी प्रथम श्रेणी सामन्यात एकाच षटकात ६ षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.